पुणे : ससून रुग्णालयातून कैद्याने पलायन केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी ससून रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. दोषी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी धंगेकर यांनी केली. त्यावेळी ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतापलेल्या धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली.
कैदी पलायन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी ससून रुग्णालयात भेट दिली. त्यांनी ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाबाबत विचारणा केली. अमली पदार्थ तस्करीचा सूत्रधार ललित पाटील याने रुग्णालयातून पलायन केल्याप्रकरणी प्रशासनाने केलेल्या कारवाईची माहिती त्यांनी विचारली. पाटील याला कुठले आजार होते आणि त्याच्यावर नऊ महिने कोणते उपचार केले, याबद्दल चौकशी धंगेकर यांनी केली. तसेच, दोषी डॉक्टरांवर गुन्हे दाखल न करण्याचे कारणही त्यांनी विचारले.
हेही वाचा – पिंपरीतील जलतरण तलावांचे होणार सुरक्षाविषयक लेखापरीक्षण
यावर अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने रुग्णावर कुठले उपचार सुरू आहेत, याबाबत कायद्याने माहिती देता येऊ शकत नाही, असे कारण त्यांनी सांगितले. डॉ. ठाकूर यांच्या उत्तरामुळे धंगेकर संतापले. या प्रकरणात दोषी असणाऱ्या दोषी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत तेथून जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
ससूनवर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र इथे गुन्हेगारांना व्हीआयपी उपचार आणि सर्वसामान्य रुग्णांना त्रास दिला जातो. ललित पाटील प्रकरणी दोषी असलेल्या डॉक्टरांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. हा सर्व प्रकार गंभीर असून, अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार आहे. – रवींद्र धंगेकर, आमदार, काँग्रेस</p>
हेही वाचा – भाजपा आमदार अश्विनी जगताप यांचा रौद्रावतार, म्हणाल्या, “माझ्या नादी लागू नका…”
ससूनमधील कैदी रुग्णांच्या उपचाराचा तपशील कायद्यानुसार जाहीर करता येत नाही. या प्रकरणी विभागीय आयुक्तांना अहवाल सादर केला आहे. रुग्णावर कोणते उपचार करायचे हे ठरविण्याचा अधिकार डॉक्टरांचा आहे. त्यामुळे मी त्यावर बोलू शकत नाही. – डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय