पुणे : देशभरातील लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडत असून आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. या तिसर्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदारसंघदेखील येत आहे. यंदा प्रथमच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत बारामती लोकसभा मतदारसंघात पाहण्यास मिळत आहे. या निवडणुकीकडे देशाच लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीच्या काळात दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले. हे आरोप प्रत्यारोप थांबत नाही. तोवर आजवर बारामती जेथे शरद पवार हे प्रचाराची सांगता सभा घेत आले. पण त्याच ठिकाण अजित पवार यांनी सभा आयोजित केली आहे. त्यामुळे शरद पवार यांना सभेचं ठिकाण बदलावं लागलं. त्यामुळे यावरून पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
या सर्व एकूणच घडामोडींबाबत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, पार्टी चोरली, चिन्ह चोरलं, राजकीय यंत्रणादेखील चोरली आणि आता मागील अनेक वर्षांपासून शरद पवार यांची ज्या मैदानावर आजपर्यंत प्रचाराची सांगता सभा होत आली. ते मैदान देखील त्यांनी (अजित पवार)चोरलं. त्यामुळे मी आज एवढच म्हणेन की, सगळं चोरलं तरी विचार, कार्यकर्ते, सर्व सामान्य नागरिक चोरता आले नाही. त्यामुळे या गद्दारांना बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिक लोकशाहीच्या माध्यमांमधून धडा शिकवेल आणि सुप्रिया सुळे या किमान साडे लाख मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त करित अजित पवार यांच्यावर त्यांनी टीका केली.
आणखी वाचा-लघुरूप वापरलेल्या ऑनलाइन पदवी अभ्यासक्रबाबत युजीसीचा सावधगिरीचा इशारा
तसेच ते पुढे म्हणाले की, राज्यातील अनेक भागात महा विकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे सध्याच्या स्थितीला आम्हाला 35 जागा मिळतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दुर्दैवाने अजितदादा भाजपसोबत गेले
पवार कुटुंबात कधी फूट पडेल आणि पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळेल, असे कधी वाटले होते का? या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, मला अनेक महिन्यांपासून वाटत होते की, पवार कुटुंबात फूट पाडण्याचा भाजप प्रयत्न करीत होते. पण मला नेहमी वाटायच की, पवार कुटुंब स्वाभिमानी असल्याने, कुटुंबातून कोणीही फुटणार नाही. याबाबत मला विश्वास होता. मात्र दुर्दैवाने अजितदादा भाजपसोबत गेले आहेत. त्यांना त्यांचं साम्राज्य टिकवायचं होतं. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्यांच्यावर कारवाई होणार होती. त्यामुळे व्यक्तिगत दृष्टीकोनातून अजित पवार भाजपसोबत गेले आहेत. आम्ही मराठी माणसं, स्वाभिमानी माणसं आहोत. त्यामुळेच आज आम्ही संघर्षाची भूमिका घेतली असून आमच्यासोबत महाराष्ट्र असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.
आणखी वाचा-निर्मला सीतारामन यांना विद्यार्थिनीने विचारला प्रश्न… ‘तुम्ही कणखर कशा?’
दादांनी चुकीची भूमिका घेतल्याने आम्हाला विरोधात बोलावं लागतंय
पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी लढत प्रथमच होत आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्याबद्दल काय वाटत. त्या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक भागाला न्याय मिळावा, यासाठी संसदेत अभ्यासूपणे आवाज उठविण्याच काम केलं आहे. तर काकीबाबत बोलायचं झाल्यास, त्या आईसमान आहेत. पण शेवटी राजकारणामध्ये आल्यानंतर आपलाच विचार करतात. त्यामुळे काही प्रमाणात स्वभाव बदलतात आणि दादांकडून जे काही सुरू आहे. ते आम्हाला पटत नाही. तसेच दादांनी चुकीची भूमिका घेतल्याने, आम्हाला विरोधात बोलावं लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
तुमचा पुतण्या विचारांना आणि साहेबांना सोडणार नाही
मागील काही वर्षात काका आणि पुतण्यामध्ये संघर्ष पाहण्यास मिळाला आहे. तुमच्यादेखील वाट्याला हाच संघर्ष आला आहे. तर आजच्या दिवशी काका (अजित पवार) यांच्या बद्दल काय वाटतं? या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, काका मला बच्चा म्हणतात, मला कच्ची पिली म्हणाले, मी खरच त्यांच्यासाठी लहानच आहे. मी जसा त्यांच्यासाठी लहान आहे. त्याप्रमाणेच ते (अजित पवार) साहेबांसाठी लहान आहेत. साहेबांनी वडीलधाऱ्याप्रमाणे तुम्हाला सांभाळलं आणि त्यांनाच तुम्ही सोडून गेलात. पण हे माझ्या बाबतीत घडलं नाही. काकाच पवार कुटुंबीयांना सोडून गेले आहेत. मी साहेबांसोबत आहे. त्यामुळे आज दादांना एक सांगायचे आहे की, तुम्ही विचार बदलले, स्वार्थीसाठी पवार साहेबांना सोडून गेलात. पण तुम्ही निश्चिंत रहा, तुमचा पुतण्या विचारांना आणि साहेबांना सोडणार नाही. तसेच माझी संघर्षाची भूमिका असून मी पळून जाणार्यामधील नाही. तर आम्ही जिंकण्यासाठी लढणार असल्याचे सांगत अजित पवारांना त्यांनी टोला लगावला.
बारामतीमधील मतदान झाल्यावर आगामी काळात पवार कुटुंबीय एकत्र दिसणार का? त्या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, बाकीच्यांचं मला माहिती नाही. पण ज्या पद्धतीने राजकारण खालच्या पातळीवर गेलं आहे. त्यामुळे मी तर कोणासोबत दिसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.