जेजुरी : कोणी उठायचे आणि आपला इतिहास कसाही तोडायचा-मोडायचा, एखादे वक्तव्य करायचे, सध्या ही ‘फॅशन’ झाली आहे. पण, त्यामुळे समाजात तेढ निर्माण होते. खरा इतिहास बाजूला ठेवल्यामुळे नंतर त्याचा उद्रेक होतो. जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केले त्याबाबत हसावे की डोके फोडून घ्यावे हे समजेना, केवळ चर्चेत राहण्यासाठीच अशी वक्तव्य केली जातात. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असे हिंदू बांधवांमध्ये भीती निर्माण होऊ लागल्याने हिंदू जनआक्रोश मोर्चे निघत आहेत. देव-देश आणि धर्माच्या रक्षणासाठी सर्वांनी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
जेजुरीत गुरुवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जाहीर सभेत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मार्गदर्शन केले. शिवेंद्रराजे म्हणाले, हिंदू धर्म कोणाच्या विरोधात नाही. पण धर्माचे तुकडे करून त्यातून लव्ह जिहाद सारख्या घटना घडत असतील तर रस्त्यावर उतरलेच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व शिवशाहीतील पुढील राजे, सरदार मुघलांच्या विरोधात लढले, पण त्यांनी दुसऱ्या धर्माविरोधात काही केले नाही. मात्र, अफजलखान व त्याच्या साथीदारांनी हिंदूंचे मंदिरे तोडून युद्ध केले. आपण आपल्या देवधर्माच्या रक्षणासाठी दबाव निर्माण केला पाहिजे. लव्ह जिहाद, धर्मांतरण व गोहत्या या विरोधात कायद्यात बदल करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करू. आपली एकजूट कायम ठेवा, चुकीच्या इतिहासाला बळी पडू नका, हिंदू समाजाची ताकद वाढली पाहिजे.
हेही वाचा – पुणे : मूल होण्यासाठी पत्नीला पाजली स्मशानातील राख, भरभराटीसाठी मृतांच्या हाडाची पावडर
किल्ले संवर्धन समितीचे विक्रम पावसकर म्हणाले, हिंदू समाजातील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून मोठ्या प्रमाणात लव्ह जिहाद सारखे प्रकार घडत आहेत. मुस्लीम व ख्रिश्चन धर्मियांकडून हिंदू धर्मियांचे धर्मांतर होत आहे. या विरोधात सर्वांनी कडक भूमिका घ्यावी. मुलींसाठी संस्कार वर्ग सुरू करा. भारत हे हिंदू राष्ट्रच आहे आणि या हिंदू राष्ट्रात हिंदूंवर होणारा अन्याय सहन करणार नाही.
हेही वाचा – चिंचवड पोटनिवडणूक: ‘राजा का बेटा राजा नही बनेगा!’ भाजप विरोधात राष्ट्रवादीने दंड थोपटले?
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेंद्र ठकार यांनी केले. या मोर्चासाठी तालुक्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव आले होते. पालखी मैदानापासून सुरू झालेला मोर्चा खंडोबा गडामार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर सभा घेण्यात आली. सभेसाठी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. राजाभाऊ चौधरी, सचिन पेशवे, गणेश भोसले, विठ्ठल सोनवणे, अलका शिंदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.