लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : गेल्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण नकारात्मक असल्याचा भाजपच्या सर्वेक्षणात आढळून आले असतानाच लोकसभेच्या निवडणुकीतही ‘शिवाजीनगर’मधून भाजपचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही, त्यामुळे हा मतदार संघ हातातून जाऊ नये, यासाठी आता भाजपची धडपड सुरू झाली असून, विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे हे कमालीचे ‘सक्रिय’ झाले आहेत.
मागील दोन ते तीन दिवासांपासून आमदार शिरोळे यांनी मतदारसंघातील नागिराकंच्या भेटी गाठी घेत त्यांच्याशी संपर्क वाढविण्यास सुरु केले आहे. मतदारसंघातील विविध भागांमध्ये भेट देत नागरिकांशी संवाद साधत आमदार शिरोळे यांनी मतदारसंघात आता अधिकच लक्ष घालण्यास सुरुवात आहे. मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेत हे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत यासाठी बैठका घेणे त्यांनी सुरु केले आहे.
आणखी वाचा-सायबर चोरट्यांची हिम्मत वाढली; तपासणीच्या नावाखाली महिलेचा विनयभंग
लोकसभा निवडणुकींपूर्वी भारतीय जनता पक्षाने शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात सर्वेक्षण केले होते. यामध्ये शिवाजीनगर, कॅन्टोंन्मेंट आणि खडकवासला या मतदारसंघातील निकाल पक्षाच्या विरोधात आले होते. यानंतर भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या दोन ते तीन सर्वेक्षणमध्येही हेच चित्र समोर आले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला शिवाजीनगरमधून अपेक्षित मताधिक्य मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले. आगामी विधानसभेसाठी ही भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याचे चर्चा आहे.
आगामी विधानसभेच्या निवडणुका राज्यात सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे महायुतीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधारी पक्ष असलेल्या या तिघांनी महायुतीकडून निवडणूक लढविण्याचे ठरविल्यास पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील दोन ते तीन जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे ज्या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात वातावरण आहे, अशा जागा महायुतीत मित्र पक्ष असलेल्या पक्षाला सोडल्या जाण्याची अधिक शक्यता आहे. यामध्ये शिवाजीनगर मतदारसंघाचाही समावेश असू शकतो. यासर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर हा भाजपचा असून तेथे भाजपचाच उमेदवार विजयी होऊ शकतो, यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे सक्रिय झाले आहेत. नव्या जोशात आमदार शिरोळे यांनी जोरदार कामाला सुरुवात केल्याने मतदारसंघातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
आणखी वाचा-पिंपरी : कांदा चाळीप्रमाणे आता बेदाणे शेडसाठी दहा लाखांचे अनुदान
आमदार शिरोळे यांनी शिवाजीनगर मतदारसंघातील प्रश्नांचा आढावा घेत हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी नुकतीच महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी भेट घेत चर्चा केली. तसेच बालगंधर्व रंगमंदिरातील समस्यांबाबत पालिकेतील अधिकारी आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह इतरांशी संवाद साधत येथील समस्या, कलाकारांचा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना केल्या. याबरोबरच मतदार संघातील वाकडेवाडी, पांडवनगर येथील पीएमसी कॉलनीच्या पुनर्निर्माणाचा प्रश्न, भूजल पातळी, रेन हार्व्हेस्टिंग, पावसाळी गटारे, ई स्वच्छतागृह, सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, सांडपाणी व्यवस्था, अपुरा पाणी पुरवठा, नदी पात्रात टाकले जाणारे निर्माल्य, रस्त्यांवरील अतिक्रमणे या प्रश्नांकडे लक्ष वेधले.
९० लाख रुपयांची विकासकामे
आमदार निधीतून खडकी भागातील ९० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन देखील आमदार शिरोळे यांनी केले आहे. व्यायामशाळा, कॉंक्रीटीकरण, नवीन ड्रेनेज लाईनचे काम, पेव्हिंग ब्लॉक बसविणे ही कामे केली जात आहेत. या कामाच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार शिरोळे यांनी आपली तयारी सुरु केली.