… तर न्यायालयात खेचून दाखवा, खासदार सुप्रिया सुळेंचे आव्हान

पुणे :  कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी नाव घेतले तर न्यायालयात खेचीन, अशी नोटीस आमदार सुनील टिंगरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठवली आहे. पोर्शे’तील गुन्हेगारांच्या मागे तुम्हीच होता, त्यामुळे आता या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण आणि तरुणीला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडीचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारासाठी येरवडा येथे खासदार सुप्रिया सुळे यांची जाहीर सभा झाली. त्यामध्ये त्या बोलत होत्या. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

ज्या शरद पवारांनी गेल्या निवडणुकीसाठी एबी फॉर्म वर सही करून सुनील टिंगरे यांच्या हातात दिला. त्यांनीच आज पवार  साहेबांना नोटीस पाठवली आहे. हिम्मत असेल तर न्यायालयात खेचूनच दाखवा, असे आव्हान सुळे यांनी दिले. आमदार झाल्यानंतर बापू पठारे यांनी या भागात कोणताही अपघात झाल्यास पोलिस स्टेशनमध्ये न जाता रुग्णालयात जाईल, असा शब्द मला द्यावा, अशी मागणी सुळे यांनी केली.

हेही वाचा >>> सदनिकेत अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची सुटका- बेशुद्धावस्थेतील महिलेवर त्वरीत उपचार केल्याने अनर्थ टळला

एकदा विकलेला माल दुकानदार पुन्हा घेत नाही. तर विकला गेलेला आमदार पुन्हा निवडून का द्यायचा, असा प्रश्न शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. संपूर्ण राज्यात महिला सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. फडणीसांनी लाल रंगाच्या संविधानाला नक्षली म्हणणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान असे अंधारे म्हणाल्या. या सभेत माजी नगरसेवक हनिफ शेख, भाजपचे माजी नगरसेवक आयुब शेख आणि मनसेचे पदाधिकारी सादिक शेख यांनी राष्ट्रवादी (शरद पवार)  पक्षात प्रवेश केला.

तर तुमचीही अंडीपिल्लं बाहेर काढू… वडगाव शेरी येथे झालेल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी,(शरद पवार) पक्षाचे उमेदवार बापू पठारे यांना दम दिला. तुमची अंडी पिल्ली बाहेर काढू असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा कोणाचेही नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला. सुळे म्हणाल्या, आम्हालाही तुमची अंडी पिल्ली माहीत आहेत. जुने कशाला बाहेर काढता. नाहीतर, ‘यहा से भी करारा जवाब मिलेगा’ हे लक्षात ठेवा.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla sunil tingre sent notice to senior leader sharad pawar in porsche car accident case ccm 82 zws