पुणे : अहिल्यानगरमार्गे पुणे-नाशिक रेल्वे हा पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वेसाठी पर्यायच असू शकत नाही. या नवीन मार्गामुळे सुमारे ८० किलोमीटर अंतर वाढणार असल्याने प्रवासाचा कालावधी दीड तासांनी वाढेल. मग, हा प्रवास ‘द्रुतगती’ कसा होईल, असा सवाल उपस्थित करण्यात येत असून, राजकीय हेतूपोटी हा मार्ग बदलण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप आमदार सत्यजित तांबे यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वेमार्गामध्ये जुन्नर तालुक्यातील खोडद गावातील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप – जीएमआरटी) हा अडथळा ठरत आहे. त्यामुळे रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक असा मार्ग प्रस्तावित करून जुना मार्ग रद्द केला. नवीन मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे कामही अंतिम टप्प्यात असून, हा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर नीती आयोगाकडे पाठविला जाणार असल्याने या मार्गाला मंजुरी मिळण्यापूर्वी जुन्या द्रुतगती मार्गाबाबत सर्वपक्षीय लढा उभारण्यात येणार असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले. याबाबत त्यांनी समाज माध्यमावर मत नोंदवले आहे. ‘जुनाच मार्ग व्हावा, यासाठी सर्वपक्षीय लढा उभारू,’ असा इशारादेखील त्यांनी दिला आहे.

‘नाशिक-सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-मंचर-चाकण-पुणे हा सरळ मार्ग सोडून अहिल्यानगर-शिर्डीमार्गे नाशिक या मार्गे रेल्वे नेण्याचा घाट घातला जाणे दुर्दैवी आहे. पुणे-नाशिक-मुंबई हा सुवर्ण त्रिकोण साध्य करण्यासाठी सरळ मार्गानेच रेल्वे जाणे गरजेचे आहे,’ असे तांबे यांनी म्हटले असून, ‘आमचा पुणे-अहिल्यानगर मार्ग पुणे-नाशिक मार्गासाठी पर्याय ठरू शकत नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे. रेल्वेमार्गामुळे पुणे-नाशिक हे अंतर पावणेदोन तासांत पूर्ण होऊ शकते. त्यामुळे उद्याोजकता वाढेल. सिन्नर, संगमनेर, चाकण, खेड, हवेलीसारख्या तालुक्यांमधील शेतमालाला बाजारपेठ मिळेल, मालाला भाव येईल,’ असे तांबे यांनी नमूद केले आहे.

जीएमआरटी प्रकल्पाच्या अडथळ्यावर मार्ग काढण्यासाठी ‘महारेल’ने जमिनीखालून बोगद्याद्वारे सहज रेल्वे जाईल, असे त्यांच्या अहवालात स्पष्ट केले आहे. त्यानुसार या पर्यायाचा अभ्यास करून अवलंब करावा. मात्र, जुना मार्गच उद्याोजकतेच्या दृष्टीने उत्तम आहे.  – सत्यजित तांबे, आमदार