पुणे : महापालिकेच्या आयुक्त कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत महापालिका प्रशासनाला जाब विचारला. महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी चुकीच्या पद्धतीने काम केल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत समोर आले आहे.

त्यानंतरही जगताप यांच्यावर  कारवाई न करता त्यांना वाचविण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात आंदोलन केले. या वेळी महापालिका आयुक्तांनी जगताप यांच्यावर कारवाई करण्याचे ‘लेखी’ आश्वासन दिल्यानंतर मनसेने आंदोलन मागे घेतले. मिळकत कर विभागाचे उपायुक्त माधव जगताप गेल्या काही दिवसांपासून चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या बद्दल आलेल्या तक्रारींची शहानिशा करून चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिले होते.

महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी काम केलेल्या सर्वच विभागांत मनमानी कारभार करून भ्रष्टाचार केला आहे. ते अतिक्रमण विभागाचे उपायुक्त असताना औंध येथील परिहार चौकातील ३० विक्रेत्यांना बेकायदा परवाने दिल्याचे महापालिकेच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यानंतरही जगताप यांच्यावर कारवाई होत नसल्याने जगताप यांच्या मागे कोण ‘आका’ आहे, असा प्रश्न उपस्थित करत मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. प्रशांत भोलागिर, निखिल जोशी, महेश शिर्के, अनिल कंधारे या वेळी उपस्थित होते.

आंदोलनाबाबत अधिक माहिती देताना समभुज म्हणाले, ‘जगताप यांच्या कार्यकाळात मिळकतकर विभागात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून येत आहे. सिंहगड इन्स्टिट्यूटच्या ४८ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी दिरंगाई करत दिलेले अभय, शंभर थकबाकीदारांवरील कारवाईला टाळाटाळ अशी प्रकरणे आयुक्त भोसले यांच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, त्यावर कोणतीच ठोस कारवाई झाली नाही.

अतिक्रमण विभागाचे उपायुक्त असताना औंध येथील परिहार चौकातील ३० व्यावसायिकांना बेकायदा परवान्यांचे वाटप केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यावरही कोणताही निर्णय होत नसल्याने याविरोधात जाब विचारण्यासाठी महापालिकेत आयुक्त कार्यालयाच्या बाहेर मनसेने आंदोलन केले.’ आंदोलनानंतर महापालिका आयुक्तांनी पुढील महिन्याभरात माधव जगताप यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असे पत्र दिल्याने आम्ही आंदोलन मागे घेतले. महिनाभरात कारवाई न झाल्यास पक्षाच्या वतीने रस्त्यावर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संभूस यांनी दिला आहे.

Story img Loader