महापौर आणि पदाधिकाऱ्यांनी केलेला कोरिया दौरा तसेच अतिक्रमण विभागप्रमुख रमेश शेलार यांचे गैरव्यवहार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात महापालिकेत विरोधकांनी केलेल्या आंदोलनांमुळे मंगळवारी सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ झाला. आक्रमक विरोधकांमुळे सत्ताधाऱ्यांना नमते घ्यावे लागल्याचे चित्र या वेळी पाहायला मिळत होते.
महापालिकेची सभा सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी गटनेता वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आणि घोषणाबाजी सुरू करून पालिका भवन दणाणून सोडले होते. मनसेच्या आंदोलकांनी महापौरांना त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर पडू न दिल्यामुळे महापौर सर्वसाधारण सभेसाठी सभागृहात जाऊ शकल्या नाहीत. महापौरांच्या दालनाबाहेर तसेच सभागृहाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने जमून हे आंदोलन केले. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या विरोधात या वेळी जोरदार घोषणा देण्यात दिल्या जात होत्या.
अखेर अध्र्या तासानंतर सभेत जाण्यासाठी महापौरांच्या दालनासमोरील आंदोलन मागे घेण्यात आले आणि त्यानंतर सर्वसाधारण सभा सुरू झाली. सभा सुरू होताच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे नगरसेवक ‘रमेश शेलार यांना निलंबित करा’ अशी घोषणा देत करत महापौरांच्या आसनासमोर आले. शेलार यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करणारे फलकही त्यांनी या वेळी हातात घेतले होते. जोवर शेलार यांच्या निलंबनाची घोषणा होत नाही, तोपर्यंत सभेचे कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा या वेळी युतीच्या नगरसेवकांनी घेतला.
याच वेळी मनसेचे नगरसेवक महापौरांनी पुणेकरांची माफी मागावी अशी मागणी करत होते. विरोधकांच्या या घोषणांमुळे तसेच सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील भाषणांमुळे सत्ताधारी चांगलेच अडचणीत आले. अखेर महापौर वैशाली बनकर यांनी कोरिया दौऱ्याबाबत निवेदन केले. त्या म्हणाल्या, की या दौऱ्याला आम्हाला सहकुटुंब बोलावण्यात आले होते. त्यामुळे आम्ही सहकुटुंब गेलो होतो. मात्र, दौऱ्यावर जाण्यासंबंधीची कार्यपद्धती आम्हाला योग्यप्रकारे माहिती नव्हती. यापुढे योग्य ती काळजी घेऊनच अशाप्रकारच्या दौऱ्यांचे कार्यक्रम पार पाडले जातील.
शेलार यांच्यावरील कारवाईबाबत युतीच्या आग्रहानंतर आयुक्त महेश पाठक यांनी सभागृहात निवेदन केले. शेलार यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला होता. प्राप्त खुलासा संक्षिप्त असून चौकशीसाठी तीन अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. त्यांच्याकडून आणखी खुलासा मागवण्यात आला आहे. तो प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पाठक म्हणाले. मात्र, आयुक्तांच्या निवेदनाला सभागृहनेता सुभाष जगताप, तसेच भाजपचे गटनेता अशोक येनपुरे, प्रा. मेधा कुलकर्णी, तसेच अविनाश बागवे, सुनील गोगले आदींनी हरकत घेऊन शेलार यांनी गैरव्यवहार केल्याचे सिद्ध होऊनही त्यांना निलंबित का करत नाही, अशी विचारणा केली. त्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करा अशी सभागृहाची भावना आहे. ती लक्षात घेऊन कारवाई करा, असे जगताप म्हणाले. त्यावर या भावनेचा गंभीरपणे विचार करू, असे आयुक्तांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी