पिंपरी- चिंचवड : बँकेत दैनंदिन व्यवहारासाठी मराठी भाषेचा वापर करण्यात यावा या आग्रही मागणीसाठी मनसे ने महाराष्ट्रातील विविध बँकेत जाऊन निवेदन दिली आहेत. लोणावळ्यात मात्र अमराठी बँक मॅनेजरच्या भांडणात मराठी बँक कर्मचारी पडल्याने त्याला मनसेने चांगलाच चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा सर्व प्रकार पर्यटन नगरी लोणावळा मधील आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ही घटना घडली आहे.

सविस्तर माहिती अशी, राज ठाकरे यांच्या गुढी पाडव्याच्या भाषणानंतर मनसे सैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरे यांनी मराठी भाषेविषयी मनसे सैनिकांना आवाहन केलं होतं. याच संदर्भात विविध बँकांमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बँक मॅनेजरला निवेदन देऊन मराठी भाषेचा वापर करण्याबाबत मनसे स्टाईल विनंती केली.

लोणावळ्यात मनसे पदाधिकारी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये गेले. मनसे सैनिकांनी अमराठी असलेल्या बँक मॅनेजरला मराठी बोलण्याबाबत विनंती केली. बँक मॅनेजरने मराठीत बोलता येत नाही, असं स्पष्ट सांगितलं. यावर मनसे सैनिक भडकले, त्यांनी शासनाचा नियम समजावून सांगितला. अधिकाऱ्यांनी मराठीत बोलायला हवं. असं मनसे पदाधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितलं. बँकेचे नाव महाराष्ट्र आहे. तर, मराठी भाषा आलीच पाहिजे असं एकाने सांगितलं.

यावर बँक मॅनेजर ने येवढे तुम्ही आक्रमक का? झाला आहात. असं म्हणताच दुसऱ्या मनसे सैनिकाने कानशिलात लागावेल असं म्हटलं. वाद होत असल्याचं पाहून मराठी बँक कर्मचारी अमराठी बँक मॅनेजरच्या मदतीला धावून आला. ग्राहकाला कुठला त्रास आहे का? असा म्हणत मनसे सैनिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात सर्व राग मराठी कर्मचाऱ्यावर काढत त्यालाच चोप दिला. त्यांच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.