पुणे : अयोध्या दौरा काही जणांना खुपला. त्यासाठी विरोधाचा सापळा रचून त्याला राज्यातूनच रसद पुरविण्यात आली. त्यामुळे अयोध्येला न जाण्याचा निर्णय घेतला, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित करण्यामागील भूमिका रविवारी स्पष्ट केली.

अयोध्या दौरा रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर राज यांची जाहीर सभा रविवारी पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, राणा दाम्पत्यावर टीका करतानाच औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्दय़ावरून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही कडाडून हल्ला चढविला.

अयोध्येला जाऊन रामजन्मभूमी आणि ज्या ठिकाणी कारसेवक मारले गेले त्या जागेला भेट देणार होतो. मात्र राजकारणात अनेकांना भावना समजत नाही. मी हट्टाने तिकडे जायचे ठरविले असते तर माझ्याबरोबर कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अनेक हिंदू बांधव आले असते. तेथे जर काही झाले असते तर कार्यकर्ते भिडले असते. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असते. त्यांना तुरुंगात टाकून त्रास दिला असता. ससेमिरा मागे लावण्यात आला असता. हा सर्व संभाव्य प्रकार लक्षात आल्याने मी दौरा रद्द केला, असे स्पष्टीकरण राज यांनी दिले. 

एक कोणी तरी खासदार उठतो आणि तिकडच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. माफी मागण्याची भाषा सुरू होते, मात्र १४ वर्षांपूर्वी हे कुठे होते? उत्तर प्रदेश, बिहारमधून गुजरातमध्ये गेलेल्या हजारोंना मारण्यात आले, हुसकावण्यात आले. मग या सगळय़ा प्रकरणात कोणी माफी मागायची, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

औरंगाबाद नामांतराच्या मुद्दय़ावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही राज यांनी टीका केली. तुम्ही बोलताय, म्हणजे तुम्ही आहात कोण? हिंदू-मुस्लीम राजकारणासाठी यांनी ‘एमआयएम’ला मोठे केले. उद्धव ठाकरे यांच्यावर आंदोलनाचा एक तरी गुन्हा दाखल आहे का, हे आधी त्यांनी सांगावे. निवडणुकीसाठी नामांतराचा मुद्दा त्यांना जिवंत ठेवायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता नामांतर करावे. शिवसेनेचे हिंदूत्व म्हणजे पकपक हिंदूत्व राहिले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

पावसात सभा घ्यायला निवडणूक आहे का?

मनसेच्या सभांसाठी सभागृह परवडत नाही. स. प. महाविद्यालयाने सभेला नकार दिला. नदीपात्रात सभेचे नियोजन होते. मात्र पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. बरे, निवडणुका वगैरे काही नाही, मग उगाच कशाला भिजत भाषण करायचे, अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मी सकाळी भांडायचो आणि रात्री एकत्र जेवायचो, असे सांगून शरद पवार बाळासाहेबांची विश्वासार्हता कमी करत आहेत. मात्र शिवसेनेला त्याचे काहीच वाटत नाही, असा आरोपही त्यांनी केला.

मातोश्री काय मशीद आहे का?’

राणा दाम्पत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट धरला. मातोश्री बंगला काय मशीद आहे का? राणा दाम्पत्य आणि शिवसेनेत वाद झाल्यानंतर लडाखमध्ये खासदार संजय राऊत राणांबरोबर फिरतात, जेवतात. त्याचे शिवसेनेला काहीच कसे वाटत नाही, अशी विचारणा करत भोंग्यांविरोधातील आंदोलन कायम राहील. त्यासंदर्भात कार्यकर्त्यांना पत्र दिले जाईल. कार्यकर्ते घरोघरी जातील, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

Story img Loader