महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शपथविधीवर भाष्य केलं आहे. तसेच या शपथविधीनंतर पहिल्या एका तासात त्यांनी केलेल्या ट्वीटची आठवण करून दिली. यावेळी त्यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मिलीभगत असल्याचाही आरोप केला. ते बुधवारी (२६ जुलै) पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
राज ठाकरे म्हणाले, “राज्याला विरोधी पक्षनेता तर सोडाच, पण विरोधी पक्षही नाही. कोणता पक्ष विरोधी पक्ष हे सध्या मला कळतच नाही. आमचा एकच पक्ष सध्या विरोधी पक्ष दिसतो आहे. बाकी सगळ्यांचेच लागेबांधे आहेत.”
“किती खोटं वागावं याला काही मर्यादा आहेत की नाहीत”
“अजित पवारांचा शपथविधी झाला त्या दिवशी मी पहिल्या एका तासात एक ट्वीट केलं होतं. त्यात मी पहिली टीम रवाना झाली असं म्हटलं होतं. सगळं तसंच होत आहे. आजही अजित पवार गटाचे होर्डिंग्ज लागले आहेत. त्यावर अजित पवारांच्या फोटोसह शरद पवारांचे फोटो लागले आहेत. किती खोटं वागावं याला काही मर्यादा आहेत की नाहीत,” असं राज ठाकरेंनी म्हटलं.
हेही वाचा : “अमित महाराष्ट्रभर टोलनाके…”, तोडफोडीच्या घटनेवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
“अजित पवार आणि शरद पवारांची मिलीभगत”
“शरद पवारांचं राजकारण मी खूप वर्षांपासून पाहतो आहे. त्यांचं हे असंच आहे. अजित पवार आणि शरद पवारांची मिलीभगत आहे,” असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला.
राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुण्यात मनसेच्या शाखाध्यक्ष, विभाग अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी निवडणुकीसाठी राज ठाकरे पक्षबांधणी करण्यात व्यस्त आहेत. त्यासाठी ही बैठक होती. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.