महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या राजकीय भूमिकांबरोबरच कलकार आणि साहित्याविषय असलेल्या प्रेमासाठीही ओळखले जातात. राज ठाकरेंना वाचनाचा छंद आहे. मराठी भाषेसंदर्भात राज कायमच आग्रही असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. राज यांचे मराठीवरील प्रेम आणि खास करुन अचूक मराठी वापरण्याबद्दल आणि व्याकरणासंदर्भातील सजगता बुधवारी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये दिसून आली राज ठाकरेंना एक फ्रेम भेट म्हणून देण्यात आल्यानंतर पुढल्या क्षणी त्यांनी या फ्रेममधील एक व्याकरणाची चूक मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली.
बुधवारी पुणे शहरातील मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला राज यांच्याबरोबर पुणे शहरातील मनसे पदाधिकारी वसंत मोरे आणि बाबू वागसकर आदी नेते उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान राज ठाकरेंना भगवी शाल भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार केलेल्या दोन फ्रेमही भेट करण्यात आल्या. मात्र यापैकी एका फ्रेममधील मराठी भाषा पाहून राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जागेवरच चूक दर्शवून दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो आणि त्यांचा विचार अशी रचना असलेली फ्रेम राज यांना भेट देण्यात आली. या फ्रेमवर सावरकरांचं, “जेव्हा सूर्य काजव्यांची मनधरणी करु लागतो तेव्हा सौरमंडल सुद्धा त्याच्या बाजूने उभे असत नाही!” हे वाक्य लिहिलेलं होतं. मात्र या फ्रेममध्ये मनधरणी हा एक शब्द लिहिण्याऐवजी दोन वेगवेगळे शब्द लिहिण्यात आले होते. या गोष्टीकडे राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्याचं लक्ष वेधलं.
नक्की वाचा >> “साहेब सध्याचे मुख्यमंत्री…”; जाहीर कार्यक्रमात पुणेकराने शिंदेंचा केलेला तो उल्लेख ऐकून राज ठाकरेंनीच कपाळाला हात लावला
राज यांनी भेट म्हणून मिळालेल्या सावरकरांचा विचार असलेल्या फ्रेमकडे पाहत, “मनधरणी असा एक शब्द आहे ना?” असं अगदी बोट दाखवत सांगितलं. त्यानंतर राज यांनी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या वसंत मोरेंनाही हाताचं एक बोट दाखवत ”एक शब्द” असं म्हटलं.