शहर नियोजनाविषयी परखड शब्दांत भाष्य करताना राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्र सोडलं. सत्ताधाऱ्यांची दृष्टी असेल, तर शहराच्या नियोजनात ती प्रतिबिंबित होते, असं सांगतानाच राज ठाकरेंनी मुंबई व पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी भाष्य केलं. मुंबईतील रस्ते बांधून बाहरच्यांसाठी सोय करताना तिथल्या नागरिकांची गैरसोय होत आहे, असं म्हणतानाच राज ठाकरेंनी पुणे शहर बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, अशी स्पष्ट भूमिका यावेळी मांडली. पुण्यात एका कार्यक्रमात त्यांची जाहीर मुलाखत घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले राज ठाकरे?
“प्रत्येकानं आपापला परिसर स्वच्छ ठेवला तरी अनेक गोष्टींमध्ये समाधान मिळेल. माझा विचार फक्त एवढाच होता की मला घरातून बाहेर पडल्यावर मी एका चांगल्या शहरात जगतोय असा मला फील आला पाहिजे. तर त्या जगण्याला अर्थ आहे. धक्के खातोय, फुटपाथवर पाय मुरगळतायत, खड्ड्यातून गाड्या जातायत याला जगणं म्हणत नाही. तुमचा जन्म झालाय म्हणून तुम्ही जगताय. इथल्या अनेक तरुण-तरुणींना परदेशात सभोवतालच्या याच वातावरणासाठी परदेशात जायचंय”, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
मुंबईतील प्रदूषण…
“कालच बातमी आली की मुंबई-पुण्यात प्रदूषणाचं प्रमाण वाढलंय. का? बेसुमार बांधकाम. मुंबईत कोस्टल रोड, उड्डाणपूल, रस्ते, इमारती बांधल्या जात आहेत. हे रस्ते कुणासाठी बांधले जात आहेत? ही मुंबई शहर वा उपनगरात राहणाऱ्या लोकांनी ही लोकसंख्या वाढवलेली नाही. बाहेरून येणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी तुम्ही तिथे राहणाऱ्या लोकांच्या सर्व सोयी घालवून बसताय”, असंही राज ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.
“इथे पाच पाच पुणे आहेत”
“मी गेल्या २५ वर्षांपासून पुण्यात येतोय. मी हजार वेळा सांगितलंय. मुंबई बरबाद व्हायला काळ गेला, पुणं बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. आज पुणे कुठे राहिलंय? इथे पाच पाच पुणे आहेत. हिंजवडीकडचं पुणे वेगळं, इकडचं पुणं वेगळं, नदीकाठचं पुणं वेगळं, विमाननगरचं पुणं वेगळं.. कुणाचा कशाला काही संबंधच उरलेला नाहीये. पुणं म्हणून कुठे काही राहिलंय? याचं कारण राज्यकर्त्यांचं लक्ष नाहीये”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी पुण्यातील परिस्थितीवर भाष्य केलं.
“घ्या…याला म्हणतात लोकशाही”, राज ठाकरेंचा टोला; म्हणाले, “भारत काय, इंडिया काय, हिंदुस्थान काय…!”
कोकणातील ब्रिज दुर्घटनेचाही केला उल्लेख
“दळणवळण आल्यानंतर सर्व गोष्टी बदलायला लागतात आजूबाजूच्या. हे राज्यकर्त्यांना कळलं पाहिजे की याचं टाऊन प्लॅनिंग आत्ताच करायला पाहिजे. पण ते होत नाही. कारण ती व्यवस्थाच नाही. ज्यांना यातली काही माहिती नाही, त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? मग तुम्हाला महापालिका वा राज्य सरकारकडून हेच निकाल मिळणार. परवा कोकणातला ब्रिज कोसळला, कुणाला काही सोयरसुतक नाही. १५ मिनिटांची बातमी आली, विषय संपला”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी आपली नाराजी व्यक्त केली.