मुंबई परप्रांतीयांना आंदण दिली का? असा प्रश्न विचारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत येणाऱ्या परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आणला आहे. एवढंच नाही तर फक्त गुजराती मारवाडींच्या संस्था का उभ्या राहतात? मराठी माणसांच्या संस्था का उभ्या राहात नाहीत असाही प्रश्न त्यांनी विचारला. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यांमधून दररोज ४८ रेल्वे येतात. येताना भरून येतात आणि जाताना रिकाम्या जातात. त्यातून जे लोंढे महाराष्ट्रात आणि मुंबईत येतात ते कुठे गेले? यात गुन्हेगार कोण? पोटासाठी कोण आलंय? याचा शोध घेतला जातो का? असेही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले आहेत. पोलीस आहेत म्हणून कायदा आणि सुव्यवस्था आहे, त्यामुळे पोलिसांचा आदर केला पाहिजे असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. पोलीस किंवा कोर्टाकडून येणाऱ्या कागदांमध्ये मला कधीही काहीही समजलेलं नाही. मला पकडलंय की सोडलंय हे जाणून घेण्यासाठी वकिलालाच बोलावावं लागतं असं राज ठाकरेंनी म्हणताच एकच हशा पिकला.

शाळा आणि महाविद्यालयांबाबतही राज ठाकरेंनी आपली दिलखुलास मतं मांडली. शाळा आणि कॉलेज यांची आठवण यायला लागली की आपण पन्नाशी ओलांडली असं समजावं. आता मलाही आठवण येते आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं. पुण्यात त्यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा उचलून धरत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान मराठी बांधवांसाठी कायम परप्रांतीयांच्या विरोधात भूमिका घेणारे राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहेत. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला ते हजर राहणार आहेत. २ डिसेंबरला हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण उत्तर भारतीय मंचाने राज ठाकरेंना दिलं आहे आणि त्यांनी ते स्वीकारलं आहे अशीही माहिती समजते आहे.