पुणे आणि पिंपरीत सुरू करण्यात येत असलेल्या बीआरटी प्रकल्पाला तसेच नव्या मार्गाना ‘रेनबो’ हे नाव न देता नव्या स्वरूपातील बीआरटीला ‘इंद्रधनुष्य’ हे नाव देण्यात यावे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली मागणी तातडीने मान्य करण्यात आली आहे. नव्या बीआरटीच्या बोधचिन्हामध्ये आता रेनबो बरोबरच इंद्रधनुष्य या नावाचाही समावेश केला जाणार आहे.
पुण्यात विश्रांतवाडी येथील मार्गावर नव्या स्वरूपातील बीआरटी मार्गाचे उद्घाटन रविवारी (३० ऑगस्ट) केले जाणार आहे. या बीआरटीला रेनबो असे नाव देण्यात आले आहे. या नावाला आक्षेप घेऊन इंद्रधनुष्य हे नाव या प्रकल्पाला द्यावे अशी मागणी करणारे पत्र मनसेचे गटनेता राजेंद्र वागसकर यांनी मंगळवारी महापौर, आयुक्त तसेच पीएमपीच्या अध्यक्षांना दिले होते. हे नाव न दिल्यास मनसे स्वखर्चाने इंद्रधनुष्य नावाच्या पाटय़ा तयार करून घेईल आणि त्या पाटय़ा बीआरटी मार्गावर तसेच गाडय़ांवर लावल्या जातील, असेही प्रशासनाला कळवण्यात आले होते.
पीएमपी संचालक मंडळाची बैठक बुधवारी झाली. या बैठकीत या मागणीवर चर्चा होऊन बीआरटी सेवेच्या बोधचिन्हामध्ये इंद्रधनुष्य या नावाचाही समावेश करावा असा निर्णय घेण्यात आला. तसे पत्र पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी वागसकर यांना दिले आहे. मराठीच्या आग्रहाबाबत आम्ही जी मागणी केली होती त्या मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन तसा निर्णय घेतल्याबद्दल मनसेने सर्व पदाधिकारी आणि पीएमपी संचालक मंडळाचे आभार मानले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा