कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा नको, तर आता कृती करा, अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मनसेच्या सर्व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील कचरा प्रभागातच जिरवण्याची तयारी दर्शवली आहे. असा प्रयोग सुरू करायचा असेल, तर महापालिका प्रशासनाने नगरसेवकांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही करावी, असे मनसेतर्फे शुक्रवारी आयुक्तांना सांगण्यात आले.
शहरातील कचऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या नारायण पेठेतील कार्यालयापासून हा मोर्चा काढण्यात आला. शहराध्यक्ष बाळा शेडगे, प्रकाश ढोरे, तसेच दीपक पायगुडे, गटनेता वसंत मोरे आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. पक्षाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने या वेळी उपस्थित होते. गेला महिनाभर कचऱ्याचा प्रश्न शहराला भेडसावत असून प्रशासनाच्या माध्यमातून आतापर्यंत हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने कोणताही तोडगा काढण्यात आल्याचे दिसत नाही. प्रशासन आणि सत्ताधारी फक्त चर्चेतच गुंतले आहेत. त्यामुळे तातडीने उपाययोजना करून या प्रश्नातून नागरिकांची सुटका करावी, असे निवेदन पक्षातर्फे आयुक्तांना देण्यात आले.
प्रभागात कचरा जिरवण्याची तयारी
मनसेच्या सर्व अठ्ठावीस नगरसेवकांची प्रभागातील कचरा आपापल्या प्रभागात जिरवण्याची तयारी असून त्या दृष्टीने प्रशासनाने सर्वाना विश्वासात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे मोर्चानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नगरसेवक बाबू वागसकर यांनी सांगितले. मध्य पुण्यात दाट लोकवस्तीमुळे जागा आणि अन्य प्रश्न निर्माण होऊ शकतात. तरीही शहराच्या सीमेवरील प्रभागांमध्ये आणि अन्यत्र जेथे जागा उपलब्ध होऊ शकतात तेथे हा प्रयोग होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader