Shalini Thackeray on Pune Rape case: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास एका तरुणीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली. आरोपीने तरुणीची दिशाभूल करत तिला मोकळ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बसण्यास भाग पाडले आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपीचे नाव दत्तात्रय गाडे असल्याची ओळख पटविण्यात आली असून पोलिसांची आठ पथके त्याच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.

या घटनेचे पडसाद आता पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असून राजकीय पक्षांनी स्वारगेट डेपोमध्ये आंदोलनही केले आहे. आता मनसेनेही या प्रकरणात भूमिका मांडली असून ‘शिवशाही’ नावाच्या बसमध्ये बलात्कार होत असेल तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

पुण्यातील संतापजनक घटनेनंतर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये रोष व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “महाराजांच्या काळात महिलेवर अत्याचार करणार्‍यांचा ‘चौरंगा’ केला जायचा. आज ‘शिवशाही’ नाव असलेल्या बस मध्ये एका महिलेवर अत्याचार होतो?? लाज वाटली पाहिजे छत्रपतींच्या नावावर राजकारण करणार्‍यांना… माझे सरकारला आव्हान आहे, आरोपीला शोधून त्याचा ‘चौरंग’ करा नाहीतर छत्रपतींचे नाव घेऊ नका.”

दरम्यान बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेबाबत संताप व्यक्त केला. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, “स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत होते ही बाब गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शविणारी आहे.”

शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट बस डेपोत धडक देत सुरक्षा रक्षक कार्यालयाची तोडफोड केली. तसेच स्वारगेट स्थानकात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. डेपोत उभ्या असलेल्या बसेसमध्ये लॉजिंग सुरू करण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला. आगार प्रमुखांचे निलंबन केले पाहिजे आणि सुरक्षा रक्षकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वसंत मोरे यांनी केली.

Story img Loader