महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मे पासून मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत आंदोलन पुकारलं आहे. पण त्या आंदोलनाला मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि वसंत मोरे कुठेच दिसले नाहीत. पण अखेर वसंत मोरे यांनी कात्रज गावठाण येथील हनुमान मंदिरात महाआरती आयोजित केली. या महाआरतीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण राज ठाकरे उपस्थित राहू शकले नाहीत.
ही महाआरती झाल्यानंतर मनसे नेते वसंत मोरे काहीसे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. मशिदीवरील भोंग्यांवरून राज ठाकरेंसोबत झालेल्या मतभेदांबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, “वसंत मोरे यांनी आजपर्यंत सगळे वार छातीवर घेतले आहेत. पाठीवर एकही घेतला नाही. त्यामुळे गनिमी काव्याचा प्रश्नच येत नाही.” यावेळी त्यांनी पक्षातील काही अतृप्त आत्म्यांवर देखील निशाणा साधला आहे. पण त्यांनी पक्षातील अतृप्त आत्मे नेमके कोण? याचं उत्तर देणं टाळलं आहे.
आजच्या महाआरतीच्या कार्यक्रमाचा साहेबाना मेसेज केला होता. पण साहेब कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचंही यावेळी त्यांनी बोलून दाखवलं. विशेष म्हणजे वसंत मोरे यांच्या या महाआरती कार्यक्रमाला काही मुस्लीम बांधवांनी देखील उपस्थिती दर्शवली होती. पुण्यात तुम्ही मशिदींसमोर भोंगे लावणार का? याबाबत विचारलं असता, मोरे म्हणाले की, ‘मला याची गरजच पडणार नाही. माझ्या प्रभागामधील मुस्लीम बांधव मला सहकार्य करत आहेत. त्यामुळे प्रभागातील कोणत्याही मशिदीसमोर भोंगे लावण्याची गरज पडणार नाही.’
खरंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत मुंबईतील सभेत आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे वसंत मोरे यांना शहर अध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आलं आणि साईनाथ बाबर यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. या सर्व घडामोडी दरम्यान वसंतमोरे हे पक्षापासून काहीसे दूर गेल्याचं दिसून आलं. ४ मेपासून मनसैनिकांनी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनं केली. या सर्व घडामोडी घडत असताना पुणे शहराचे मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आणि वसंत मोरे कुठेच दिसले नाही. त्यानंतर आज वसंत मोरे यांनी महाआरतीचं आयोजन केलं होतं.