पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांची अलीकडेच बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रमुख संघटक म्हणून नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीनंतर वसंत मोरे यांनी पक्ष बांधणीसाठी बारामती मतदारसंघातील चारही तालुक्यांचा दौरा सुरू केला आहे. दरम्यान, त्यांनी पुण्यातून खासदार होण्याबाबत मोठं विधान केलं आहे. पक्षाने संधी दिली तर महाराष्ट्रातला मनसेचा पहिला खासदार वसंत मोरे असेल, असा विश्वासही मोरे यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील मनसे कार्यकर्ते आमदार म्हणून तुमच्याकडे पाहत आहेत, असं विचारलं असता वसंत मोरे म्हणाले, “नाही, मला तर यावर्षी खासदार व्हायचं आहे. पुण्याचा खासदार होण्यास मी इच्छुक आहे. मला वाटतं की माझ्या पक्षाने मला संधी दिली, तर यावर्षी महाराष्ट्रातला पहिला मनसेचा खासदार हा वसंत मोरे १०० टक्के असेल.” पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वसंत मोरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा- “मोदी सरकार विचलित झाल्याने एक देश, एक निवडणूक”, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

दरम्यान, बारामती मतदारसंघातील पक्षबांधणीबाबत वंसत मोरे म्हणाले, “बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रमुख संघटक म्हणून माझी नियुक्ती झाल्यानंतर, आज पहिल्यांदा मी बारामती लोकसभा मतदारसंघातील चारही तालुक्यांना भेटी देत आहे. पुरंदर आणि बारामतीला भेट दिली आहे. आता इंदापूर आणि दौंडला भेट देईन. चारही तालुक्यातील जे पदाधिकारी आहेत, त्यांच्या नेमणुका आम्हाला करायच्या आहेत. त्यासाठी ही चाचपणी सुरू आहे. पक्ष संघटना मजबूत करणं, हा आमचा उद्देश आहे. त्यासाठी आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात काम सुरू केलं आहे.”

हेही वाचा- “अजित पवारांचे सर्व अधिकार काढून…”, फडणवीसांच्या नियंत्रणाबाबत एकनाथ खडसेंचं मोठं विधान

“निवडणुकीच्या दृष्टीकोनातून काय पाऊल उचलायचं? हे राज ठाकरे ठरवतील. पण बारामती शहरात लवकरात लवकर आम्ही राज ठाकरेंना आणणार आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा पहिला मेळावा बारामती शहरात होईल”, असंही वसंत मोरे म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader vasant more want to become mp raj thackeray pune loksabha constituency rmm
Show comments