पुणे लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष-शिवसेना-आरपीआय महायुती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज मंगळवारी (२५ मार्च) दाखल होणार आहेत.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार उमेदवारीअर्ज दाखल करण्याची बुधवार (२६ मार्च) ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे उमेदवारीअर्ज दाखल करण्यासाठी आता दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. एकदा उमेदवारीअर्ज दाखल झाला की निवडणूक आचारसंहितेनुसार दैनंदिन खर्चाचा अहवाल सादर करणे उमेदवारावर बंधनकारक असते. त्यामुळे अखेरच्या टप्प्यामध्येच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल होतात.
भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचे उमेदवार अनिल शिरोळे आणि मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांचा उमेदवारीअर्ज मंगळवारी दाखल होणार आहे. अनिल शिरोळे यांची उमेदवारी रविवारी (२३ मार्च) निश्चित झाली. त्यानंतर शिरोळे यांनी दुसरे इच्छुक उमेदवार असलेले आमदार गिरीश बापट यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पुण्यनगरीचे ग्रामदैवत कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि अखिल मंडई मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेत शिरोळे यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन प्रचाराचे नियोजन केले.
अनिल शिरोळे यांचा उमेदवारीअर्ज दाखल करण्यासाठी कसबा गणपती मंदिरापासून सकाळी दहा वाजता महायुतीचे कार्यकर्ते पदयात्रेने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहेत. नरपतगिरी चौकामध्ये छोटेखानी सभा होणार असून त्यानंतर प्रमुख नेतेमंडळींच्या उपस्थितीमध्ये महायुतीचे उमेदवार शिरोळे आपला अर्ज दाखल करणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दीपक पायगुडे यांचा अर्ज मंगळवारी दाखल होणार असून या वेळी शर्मिला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी नारायण पेठेतील पक्ष कार्यालयापासून कार्यकर्ते पदयात्रेने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहेत.