गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या मनसेच्या पिंपरी शहराध्यक्षपदाचा घोळ कायम असल्याचे चित्र पुढे आले आहे. मुंबईत होणारी बैठकच न झाल्याने पुन्हा एकदा शहराध्यक्षपदाचा निर्णय लांबणीवर पडला आहे.
नगरसेवक राहुल जाधव, सचिन चिखले आणि शशी राजेगावकर यांची नावे शहराध्यक्षपदासाठी स्पर्धेत आहेत. गटनेते अनंत कोऱ्हाळे यांच्या नेतृत्वाखालील  शिष्टमंडळाने गेल्या आठवडय़ात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली, तेव्हा योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याची ग्वाही त्यांनी दिली होती. १७ एप्रिलला मुंबईतीला बैठकीत अंतिम निर्णय होईल, असे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते. त्यानुसार, काही पदाधिकारी मुंबईत गेले. प्रत्यक्षात बैठक झाली नाही व निर्णयही झाला नाही. त्यामुळे शहराध्यक्षपदाचा घोळ कायम राहिला आहे.
मनोज साळुंके हे मनसेचे शहराध्यक्ष होते. भोसरी विधानसभेच्या निवडणुकीत सचिन चिखले यांना मनसेने उमेदवारी दिल्यानंतर ते प्रचंड नाराज झाले होते. साळुंके यांनी महेश लांडगे यांचा प्रचार केला, त्यानंतर, मनसेने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या शहराध्यक्षपदासाठी सक्षम उमेदवार मिळत नसल्याने निर्णय होत नाही. उपलब्ध कार्यकर्त्यांपैकी एकाची निवड व्हावी, यादृष्टीने प्रयत्न सुरू झाल्यानंतर जाधव, चिखले व राजेगावकरांचे नाव स्पर्धेत आले. आमच्यापैकी कोणालाही संधी द्या, पक्षाचे एकत्रितपणे काम करू, अशी ग्वाही तिघांनी मिळून दिली. प्रत्यक्षात, अजूनही निर्णय झालेला नाही.

Story img Loader