मराठी रियासत, मृत्युंजयची नवीन आवृत्ती यांसह अनेक ऐतिहासिक पुस्तकांचा समावेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विविध प्रकारची पुस्तक वाचण्याची आवड असल्याचं सर्वानाच माहिती आहे. त्याच दरम्यान दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर राज ठाकरे आले असताना बाजीराव रोडवरील अक्षरधारा बुक गॅलरीत रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जाऊन तब्बल दीड तासात २०० हून अधिक पुस्तक आणि ५० हजार रूपयांची खरेदी त्यांनी केली आहे. यामध्ये गोविंद सखाराम देसाई लिखित मराठी रियासतचे आठ खंड, मृत्युंजयची नवीन आवृत्ती यासह अनेक ऐतिहासिक पुस्तकाची देखील खरेदी राज ठाकरे यांनी यावेळी केली.
अक्षरधारा बुक गॅलरीचे प्रमुख रमेश राठीवडेकर यांच्यासोबत संवाद साधला असता ते म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजवर आमच्या दालनास अनेक वेळा भेट दिली आहे. नेहमीच विविध प्रकारची पुस्तक त्यांनी खरेदी केली आहे. मात्र आज त्यांनी दीड तासात जवळपास २०० हून अधिक पुस्तके खरेदी केली आहेत. यामध्ये मराठी रियासत, मृत्युंजयची नवीन आवृत्ती यासह अनेक ऐतिहासिक,आत्मचरित्र, कला क्षेत्रातील पुस्तकांची त्यांनी खरेदी केली आहे. जवळपास ५० हजारांची राज ठाकरे यांनी खरेदी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच राज ठाकरे यांच्या सोबत दीड तास विविध विषयावर यावेळी चर्चा देखील झाल्याचे त्यांनी सांगितले.