पिंपरी पालिकेच्या आतापर्यंत तब्बल २८३ सभा तहकूब करण्यात आल्या, सत्ताधाऱ्यांच्या या विक्रमी कामगिरीचा वेगळ्या प्रकारे आंदोलन करून मनसेने बुधवारी निषेध नोंदवला. महापौर शकुंतला धराडे यांना सभा तहकुबीच्या विक्रमास हातभार लावल्याबद्दल मनसेने मानपत्र प्रदान केले. तथापि, महापौरांनी त्याचा स्वीकार केला नाही. यापुढे सभा तहकूब होणार नाहीत, याची खबरदारी घेऊ, अशी ग्वाही मात्र त्यांनी दिली.
मनसेचे गटनेते अनंत कोऱ्हाळे यांच्या नेतृत्वाखाली सचिन चिखले, गणेश मोरे, राजू सावळे, श्याम जगताप आदींनी हे आंदोलन केले. महापौर पालिका सभेसाठी मुख्यालयात आल्या होत्या, तेव्हा त्यांच्या दालनात जाऊन कोऱ्हाळे यांनी मानपत्र देण्याचा प्रयत्न केला. पालिकेच्या विविध विषय समित्यांच्या तसेच सर्वसाधारण सभा तहकूब होत आहेत, त्यामुळे कामकाज रखडले आहे.
महत्त्वाचे निर्णय होत नाहीत. सभा तहकुबीबद्दलची माहिती मागवली असता, २८३ सभा तहकूब झाल्याची माहिती मिळाली, त्यावर चर्चा करण्याची मागणी मनसेने केली. मात्र, कोणत्याही प्रकारे चर्चा न करण्याची खेळी राष्ट्रवादीने केली. या संदर्भातील प्रश्नोत्तरे गुंडाळण्यात आली. गेल्या २० एप्रिलची सभा कोणतेही सबळ कारण न देता तहकूब ठेवण्यात आली. या पाश्र्वभूमीवर, आजचे प्रतिकात्मक आंदोलन केल्याचे कोऱ्हाळे यांनी सांगितले. यापुढे सभेचे कामकाज नियमितपणे घेण्यात येईल, अशी ग्वाही महापौरांनी दिली, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा