पुणे : लोणावळा दरम्यान लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या आणि पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढवावी या मागण्या घेऊन मनसेकडून लोणावळा रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन करण्यात आलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रुळावर उतरून काही मिनिट डेक्कन क्वीन रोखली. मनसे कार्यकर्त्यांना बाजूला करताना लोणावळा पोलिसांची दमछाक झाल्याचे बघायला मिळालं.
मावळ, पिंपरी- चिंचवड शहरातील हजारो जण हे दररोज लोणावळ्यात कामानिमित्त जातात. लोणावळा हे पर्यटन क्षेत्र असल्याने अनेक पर्यटक हे रेल्वेचा वापर करून लोणावळ्यात दाखल होत असतात. विद्यार्थ्यांना देखील लोकलच्या फेऱ्या कमी असल्याने तासन् तास लोणावळा रेल्वे स्टेशन या ठिकाणी वाट बघत लागत आहे. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस देखील लोणावळ्यात थांबा घेत नाहीत. सकाळी दहा नंतर थेट तीन वाजता लोणावळा – पुणे लोकल आहे. यामुळे नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. हीच मागणी घेऊन लोणावळा मनसेनं रेल रोको आंदोलन केलं. स्टेशन मास्तरला यावेळी मनसेकडून स्मरणपत्र देण्यात आलं असून मनसेच्या मागणीची दखल न घेतल्यास लोणावळा स्टेशनवरून यापुढे रेल्वे पुढे न जाऊ देण्याचा इशारा मनसेने दिला आहे.