पिंपरी-चिंचवडमधील मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी वसंत मोरे विरुद्ध साईनाथ बाबर या वादामध्ये सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केलाय. मनसेचे सध्या सर्वाधिक चर्चेत असणारे नेते वसंत मोरे आणि नवनिर्वाचित पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर या दोघांचा एकत्रित व्हाट्सअप स्टेट्स सचिन चिखलेंनी ठेवलं आहे. एकीकडे सचिन चिखले यांच्या मतदार संघात मोठ्या प्राणावर मुस्लीम मतदार आहेत. तर दुसरीकडे सचिन यांचा साईनाथ बाबर यांनाही पाठिंबा आहे. त्यामुळेच दोन्ही नेत्यांना समर्थन दर्शवण्यासाठी आणि आपली समतोल भूमिका मांडण्यासाठी सचिन यांनी एक अनोखा फोटो स्टेटसला ठेवलाय.
नक्की वाचा >> “हॅलो, वसंत मोरे? मुख्यमंत्र्यांना तुमच्याशी बोलायचं आहे”; राज यांनी उचलबांगडी केलेल्या पुण्याच्या माजी मनसे शहराध्यक्षांना फोन
मनसेचे फायरब्रॅंड नेते म्हणून वसंत मोरे यांना ओळखलं जातं. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा शब्द ते कधीच खाली पडू देत नाहीत. मात्र गुढीपाडव्या दिवशी झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी मुस्लिमांबद्दल तसेच मशिदींवरील भोंग्यांविषयी मत व्यक्त केलं आणि वसंत मोरे नाराज झाले. वसंत मोरे यांनी उघड नाराजी व्यक्त केल्याने त्यांना शहराध्यक्ष पदावरून पायउतार व्हावं लागलं. वसंत मोरे यांना राष्ट्रवादीसह, शिवसेना, काँग्रेसबरोबरच आपकडूनही पक्षात घेण्यासाठी नेत्यांची चढाओढ लागली आहे. मात्र, मी मनसेतच राहणार असल्याचे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
नक्की वाचा >> पुणे : भोंगा प्रकरणामुळे आधी राज ठाकरेंनी शहराध्यक्ष पद काढून घेतलं अन् आता पोलिसांची नोटीस; वसंत मोरेंच्या अडचणी वाढल्या
एकीकडे मोरे यांच्या मतदार संघात मुस्लीम मतदारांची संख्या जास्त असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. राज ठाकरे यांना मोरे यांची भूमिका न पटल्याने त्यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्याची चर्चा आहे. मात्र दुसरीकडे त्यांच्या मतदार संघात मुस्लीम मतदारांच्या मनात वसंत मोरे यांच्याविषयी आदर वाढला आहे. मुस्लीम मतदान हे त्यांच्या बाजूने असल्याचं बोललं जातं आहे. याचा फायदा आता पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले घेत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. चिखले यांच्या मतदारसंघात हजारोंच्या संख्येने मुस्लीम मतदार आहेत. मात्र राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेमुळे त्यांची गोची झाली आहे. अर्थात हे सचिन उपघडपणे मान्य करत नाहीत.
नक्की वाचा >> पुणे शहराध्यक्ष पदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी राज ठाकरेंकडून…”
त्यामुळेच सचिन चिखले यांनी वसंत मोरेंनी साईनाथ बाबर यांना शुभेच्छा देताना शेअर केलेला फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलाय. विशेष म्हणजे या फोटोमध्ये वसंत मोरे हे मावळ्याची वेशभूषा करुन आहेत तर साईनाथ बाबर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेहरावात असलेले दिसत आहेत. साईनाथ बाबर यांना शराध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर शुभेच्छा देताना मोरे यांनी, “आरे मी तर कधी पासूनच तुझा मावळा आहे” असं म्हटलं होतं. “कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड खूप खूप अभिनंदन साई,” असंही मोरे यांनी म्हटलंय.
नक्की वाचा >> पुण्यातील मनसे शहराध्यक्षांचा राज यांना घरचा आहेर; भोंगे लावण्यास नकार देत म्हणाले, “राजसाहेबांचं भाषण कळलंच नाही, आम्ही…”
हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.