शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी पर्यायी ऊर्जेचा वापर करावा यासाठी महापालिकेतर्फे प्रोत्साहन दिले जात असले आणि अशा ऊर्जेचा वापर करणाऱ्या नागरिकांना मिळकत करामध्येही सूट देण्यात येत असली, तरी महापालिकेने लाखो रुपये खर्च करून पालिका भवनात बसवलेला सौरऊर्जेचा प्रकल्प मात्र गेले सव्वा वर्ष बंदच आहे. सुरू झाल्यापासून हा प्रकल्प फक्त सहा दिवस चालल्याचेही स्पष्ट झाले आहे.
महापालिका भवनात पाण्यासाठी जे पंप बसवण्यात आले आहेत त्यांना लागणारी वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून पुरवण्याचा हा प्रकल्प एप्रिल २०१४ मध्ये कार्यान्वित करण्यात आला होता. महापालिकेच्या विद्युत विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाला त्यावेळी २३ लाख ४६ हजार रुपये खर्च करण्यात आले होते. प्रत्यक्षात सुरू केलेल्या दिनांकापासून हा प्रकल्प जेमतेम सहाच दिवस चालल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका भवनाच्या गच्चीवर वीज तयार करण्यासाठी ४८ सोलर पॅनेल बसवण्यात आली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी या प्रकल्पाची माहिती घेतली असता हा प्रकल्प बंद असल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तसेच या प्रकल्पातून किती वीज निर्मिती झाली आणि प्रकल्पातील वीज कोणत्या कामासाठी वापरली गेली याची विचारणा केली असता प्रकल्प बंद असल्याचे स्पष्ट झाले.
महापालिकेतील पंपांना लागणारी वीज या प्रकल्पातून तयार केली जाणार होती. हा प्रकल्प ११ किलोव्ॉटचा असून त्यात रोज सरासरी ५५ युनिट वीज तयार होणे अपेक्षित होते. एका वर्षांत या प्रकल्पात २० हजार युनिट तर दीड वर्षांत ३० हजार युनिट वीज तयार व्हायला हवी होती. प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणी केली असता या प्रकल्पाच्या डिजिटल मीटरमध्ये ३१८ युनिट वीज वापरली गेल्याचे दिसले. त्यामुळे ज्या कारणासाठी हा प्रकल्प बसवण्यात आला तो हेतूच साध्य होत नसल्याचे दिसून आले. तसेच ज्या पंपांना या प्रकल्पातून वीजपुरवठा व्हायला हवा होता त्या बाबत चौकशी केली असता सर्व पंप वीज वितरण कंपनीकडून मिळणाऱ्या विजेवरच चालत असल्याचे सांगण्यात आले. वास्तविक पालिका भवनातील पंपांबरोबरच एका इमारतीमधील टय़ुब व पंख्यांना पुरेल एवढी ऊर्जा या प्रकल्पातून तयार होऊ शकते. मात्र त्याकडे कोणाचेही लक्ष नाही, अशी परिस्थिती असल्याची तक्रारही नगरसेवक मोरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

सौरऊर्जेच्या या प्रकल्पात महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहेच आणि प्रकल्पही बंद आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यापासून सहाच दिवस चालल्याचे दिसत आहे आणि या बंद पडलेल्या प्रकल्पाकडे अधिकाऱ्यांचेही लक्ष नाही.
वसंत मोरे, नगरसेवक, मनसे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा