महापालिकेने लाखो रुपये खर्च करून पालिका भवनात बसवलेला सौरऊर्जेचा प्रकल्प सुरू असल्यापासून गेले सव्वा वर्ष बंद असल्याचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी पालिका सभेत गुरुवारी आंदोलन केले. त्यानंतर या प्रकल्पाची पंधरा दिवसांत चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे निवदेन अतिरिक्त आयुक्तांनी सभेत केले.
महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होताच मनसेच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर येऊन घोषणा द्यायला सुरुवात केली. महापालिकेने सौरऊर्जानिर्मिताचा हा प्रकल्प एप्रिल २०१४ मध्ये सुरू केला असून तो सुरू झाल्यापासून फक्त सहा दिवसच चालला आणि तेव्हापासून तो बंद आहे, असे या वेळी मनसेचे वसंत मोरे यांनी सांगितले. या प्रकल्पाला त्या वेळी २३ लाख ४६ हजार रुपये खर्च करण्यात आले होते. तसेच पहिल्या वर्षी संबंधित कंपनीकडून हा प्रकल्प चालवला जाणार होता व त्यानंतर तो महापालिकेने चालवायचा होता. प्रत्यक्षात कंपनीने आणि महापालिकेने या प्रकल्पाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे, अशी तक्रार मोरे यांनी या वेळी केली.
मनसेचे गटनेता राजेंद्र वागसकर म्हणाले, की ज्या उद्देशाने हा प्रकल्प बसवण्यात आला आहे तो उद्देश साध्यच झालेला नाही. रूपाली पाटील, पुष्पा कनोजिया यांचीही या विषयावर भाषणे झाली. बंद प्रकल्पाची माहिती महापालिकेकडे कशी नाही, अशीही विचारणा या वेळी करण्यात आली.
या विषयावर निवेदन करताना अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप म्हणाले, की महापालिकेतर्फे सौरऊर्जानिर्मितीसाठी जी यंत्रणा बसवण्यात आली आहे त्यासंबंधीची निविदा प्रक्रिया तपासली जाईल. या प्रकल्पात किती वीजनिर्मिती होणे आवश्यक होते, प्रत्यक्षात किती वीजनिर्मिती झाली याची शहानिशा केली जाईल. चौकशी करून अहवाल तयार केला जाईल व योग्य ती कारवाई पंधरा दिवसांत केली जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा