कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार द्यावा, असा मतप्रवाह मनसेच्या एका गटात असला तरी पक्षाच्या धोरणानुसार मनसे पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मनसेची ताकद भारतीय जनता पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये मनसे आणि भाजपामधील जवळीक वाढत आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीतही भाजपाला मनसेची साथ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढविणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केले आहे. शिवसेनेकडूनही कसबा विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेस आणि शिवसेनेकडूनही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करण्यात आल्याने ही निवडणूक सध्या तरी बिनविरोध होण्याची शक्यता कमीच आहे. ही बाब लक्षात घेता भारतीय जनता पक्षासह काँग्रेसनेही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पोटनिवडणुकीसाठी उमेदवार कोण असणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढविला जात असतानाच मनसेने मात्र पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कसब्यातील मनसेच्या ताकदीचा भारतीय जनता पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – इशरत जहाँ एन्काउंटर पुस्तक पुणे पोलीस आयुक्तांना भेट देणार – अंजुम इमानदार
कसबा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात भाजपानंतर शिवसेना आणि मनसेची ताकद आहे. मनसेच्या स्थापनेनंतर महापालिका निवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघातून मनसेला मोठे यश मिळाले होते. मात्र त्यानंतर अंतर्गत कलह आणि फुटीनंतर मनसेची ताकद कमी झाल्याची वस्तुस्थिती आहे. आगामी निवडणूक भाजप शिंदे गटाच्या मदतीने लढविणार आहे, हे निश्चित आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर मनसेची आणि भाजपची राजकीय जवळीक वाढत आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युती होईल, अशी चर्चाही व्यक्त होत आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या पोट निवडणुकीत मनसेची भाजपाला साथ मिळण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा – पुणे : पारगावमध्ये भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील सात जणांची आत्महत्या
‘पोटनिवडणूक लढवावी, असा एक मतप्रवाह पक्षात आहे. मात्र पोटनिवडणुकीबाबत पक्षाचे धोरण निश्चित आहे. लोकप्रतिनिधीच्या निधनामुळे जाहीर झालेली पोटनिवडणूक मनसे लढत नाही. हेच पक्षाचे धोरण आहे. त्यामुळे निवडणूक लढण्याचा प्रश्नच येत नाही. बदललेल्या राजकीय परिस्थितीत भाजपला साथ दिली जाण्याची शक्यता आहे. भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे घेतील. त्यांच्या आदेशाचे पालन केले जाईल, असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी सांगितले. मनसेच्या या भूमिकेमुळे पोटनिवडणुकीसाठी भाजपालाही बळ मिळण्याची शक्यता आहे.