पुणे : सध्या आठवड्यातून एकदाच असलेली पुणे ते जोधपूर ही रेल्वेसेवा दररोज सुरू करावी, या मागणीसाठी अखिल राजस्थानी समाज संघ पुणेच्या वतीने सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे. पुणे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ हे उपोषण सुरू आहे. परप्रांतीय समाजासंदर्भात कठोर भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मागणीस पाठिंबा दिल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
हेही वाचा >>> पुणे : राजस्थानातील आणखी एका गावाचा ‘सेक्सटाॅर्शन’चा धंदा; रायपूर सुकेती गावातील तरुण अटकेत
पुणे रेल्वे स्थानक परिसरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ सुरू करण्यात आलेल्या उपोषणामध्ये राजस्थानी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘हमारी मांगे पुरी करो…’,‘जोधपूर रेल्वे शुरु करो…’ या घोषणा या वेळी देण्यात आल्या. मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी उपोषणाच्या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला आहे.
कित्येक वर्षे पुण्यात राहणारा राजस्थानी समाज मराठी मातीशी एकरूप झाला आहे. राजस्थानात अनेक पर्यटनस्थळे आहेत. पुण्यातील अनेक लोक राजस्थानला पर्यटनासाठी जातात. त्यामुळे ही रेल्वे दररोज सुरू करावी. या लोकांचे कोणी ऐकलं नाही तर आम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे साईनाथ बाबर यांनी सांगितले. अखिल राजस्थानी समाज संघ पुणेचे अध्यक्ष ओमसिंह भाटी यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.