पुण्याच्या मावळ लोकसभेसाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केलेली आहे. स्वतः मावळ लोकसभेवर राज ठाकरे हे लक्ष केंद्रित करून आहेत, अशी माहिती मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस रणजीत शिरोळे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. मराठी माणसाचा दिल्लीत आवाज पोहोचवण्यासाठी मनसे महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील काही लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार आहे. पैकी मावळ आणि शिरूर लोकसभेवर मनसेने लक्ष केंद्रित केलं असून उमेदवार हे राज ठाकरे ठरवतील, असं रणजित शिरोळे यांनी म्हटले.
हेही वाचा – चंद्रकांत पाटील म्हणतात, ‘मी पुण्याचा सहपालकमंत्री!’
मनसेचे राज्य सरचिटणीस रणजीत शिरोळे म्हणाले, मनसेची एकला चलो रे ही भूमिका सुरुवातीपासूनच आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील काही मतदारसंघांवर राज ठाकरे यांनी लक्ष केंद्रित केलेल आहे. मावळ लोकसभेची जबाबदारीदेखील मनसेने घेतली असून मनसे मावळ लोकसभा निवडणूक लढवणार आहे. मावळ लोकसभा लढवणार हे निश्चित आहे. उमेदवार कोण असणार हे राज ठाकरे ठरवतील. उरण, पनवेल, कर्जत, मावळ, चिंचवड, पिंपरी असा मावळ लोकसभा मतदारसंघ आहे. मावळ लोकसभा हा भिन्न विचारांचा मतदारसंघ आहे. प्रत्येक ठिकाणचे प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे कुठल्या एका मुद्द्यावर ही निवडणूक होणार नाही. मराठी माणसाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे या मागची ही भूमिका आहे. महाराष्ट्रात ४८ खासदार आहेत. परंतु, महाराष्ट्राची ठाम भूमिका मांडताना दिसत नाहीत. पक्ष हित पहिले मग जनता अशा पद्धतीची खासदारांची स्थिती आहे. अनेक खासदारांच्या मागे सीबीआय, ईडी लागलेली आहे, असेही त्यांनी म्हटलं. शिरूर लोकसभेवरही लक्ष केंद्रित केलंय. शिरूर लोकसभादेखील लढणार असल्याचे त्यांनी म्हटले.