पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराला स्मार्ट सिटी म्हटले जाते . मुख्य रस्ते चकाचक असले तरी काही ठिकाणी मात्र खड्डे बुजवण्यासाठी स्थानिक नेत्यांना आंदोलन करावं लागत आहे. मनसेच्या महिला शहर उपाध्यक्ष अनिता पांचाळ यांनी चक्क पितृपक्ष असल्याने खड्ड्यांच श्राद्ध घालत खड्ड्यांचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. काळेवाडीच्या काही भागात रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांबाबत आयुक्त शेखर सिंह यांना नुकतच निवेदन देण्यात आले होते. 

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे काळेवाडीच्या पंचनाथ मुख्य चौक, पंचनाथ कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, नढे नगर, आझाद कॉलनी या परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याबाबत मनसेच्या महिला शहर उपाध्यक्ष अनिता पांचाळ यांनी आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले होते. तसेच या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. मात्र, याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने मनसेकडून अनोखे आंदोलन करत खड्ड्यांचे श्राद्ध घालण्यात आले. यावेळी खड्ड्यांभोवती हार, मेणबत्या लावण्यात आल्या होत्या. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी याबाबत दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या अनिता पांचाळ यांच्याकडून देण्यात आला आहे. आंदोलनाच्या दरम्यान शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.