पुणे : पुणे महापालिकेतर्फे राबवण्यात येणाऱ्या नदीसुधार प्रकल्पासाठी नदीपात्रातील सहा हजार झाडे काढण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी विरोध दर्शवला आहे. हिरव्यागार पुण्याला नियमबाह्य पद्धतीने भकास केले जात असल्यास त्याला विरोध करणे हे प्रथम कर्तव्य असल्याची भूमिका मांडत मोरे यांनी पर्यावरणप्रेमींसह नदीपात्रात चळवळ उभी करत असल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा – पुणे : कोरेगाव पार्क, मगरपट्टा ‘उष्णतेचे नागरी बेट’? हवामान विभागाकडून अभ्यासाचे नियोजन
वसंत मोरे यांनी ट्विटच्या माध्यमातून या बाबत माहिती दिली. ‘पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामुळे मुळा-मुठा नदीपात्रातील ६,००० पूर्ण वाढ झालेली झाडे काढण्यात येणार आहेत. आमचा विकासाला विरोध नाही, परंतु आमच्या सुंदर पुण्याला हिरव्यागार पुण्याला जर कोणी नियमबाह्य पद्धतीने भकास करणार असेल तर त्याला विरोध करणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. पुणे शहरातील पर्यावरणप्रेमी मंडळींनी बैठकीसाठी मला आमंत्रित केले होते. राजसाहेब ठाकरे यांच्या परवानगीने मी आणि मनसे पर्यावरण शहर अध्यक्ष नितीन जगताप उपस्थित होतो. लवकरच या सर्व पर्यावरण प्रेमींसह नदीपात्रात एक चळवळ उभी करतोय, असे मोरे यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.