नारायण पेठेत महापालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या हमालवाडा वाहनतळात बसवण्यात आलेली लिफ्ट तातडीने सुरू न झाल्यास मनसे पद्धतीचे आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेचे महापालिकेतील गटनेता वसंत मोरे यांनी दिला आहे.
लक्ष्मी रस्त्यावर तसेच पेठांमध्ये निर्माण होणारा पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने हमालवाडा येथे पाच मजली वाहनतळ बांधला असून त्याचा वापर मोठय़ा प्रमाणात होतो. या ठिकाणी पार्किंगसाठी असलेली जागा नेहमीच भरून गेलेली असते. मात्र, चौथ्या वा पाचव्या मजल्यावर गाडी पार्क केल्यानंतर नागरिकांना खाली येण्यासाठी वा गाडी परत घेऊन जाताना चौथ्या वा पाचव्या मजल्यापर्यंत जाण्यासाठी येथे लिफ्टची सोय उपलब्ध नाही. लिफ्ट नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना त्याचा अतिशय त्रास होतो, असे मोरे यांनी सांगितले.
या ठिकाणी महापालिकेतर्फे लिफ्ट बसवण्यात आली होती. मात्र, संबंधित वाहनतळ इमारतीच्या नकाशाची प्रत महापालिकेकडे नसल्यामुळे येथील लिफ्टला ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. या एका छोटय़ा कारणामुळे तेथे बसवण्यात आलेली लिप्ट बंद आहे आणि त्याचा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. लिफ्ट तातडीने सुरू करून नागरिकांना सेवा द्यावी, अशी मागणी मोरे यांनी केली असून तसे पत्रही सोमवारी आयुक्तांना देण्यात आले. या ठिकाणी बसवलेली लिफ्ट तातडीने सुरू न झाल्यास आंदोलन म्हणून महापालिका भवनातील लिफ्ट बंद केल्या जातील, असाही इशारा मनसेने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा