पुणे : एके काळी पुणे शहरात ताकद असलेल्या आणि स्थापनेनंतरच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत खडकवासला विधानसभा मतदारसंघातून आमदार देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे त्याच खडकवासल्यासह आणखी एका मतदारसंघात उमेदवारच नसल्याची स्थिती आहे. यामुळे, सन २०१२ च्या महापालिका निवडणुकीत २९ नगरसेवक निवडून आलेल्या मनसेची शहरातील ताकद क्षीण होत असल्याचे चित्र आहे.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज ठाकरे यांनी सन २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. पक्षाच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत राज्यात पक्षाचे १३ आमदार निवडून आले. त्यामध्ये पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून दिवंगत रमेश वांजळे यांचा समावेश होता. मात्र, अंतर्गत गटबाजी, नेहमी ‘तटस्थ’ राहण्याचे धोरण यामुळे पक्षाची ताकद कमी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ‘मनसे’ने लोकसभा निवडणुकीत कधी युती, तर कधी आघाडीला पाठिंबा दिला. तर, विधानसभा निवडणुकीतही उमेदवार नसल्याने ‘मनसे’ने काही मोजक्याच जागा लढविल्या होत्या.
मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला. ‘राज्यातील जनता महायुती आणि महाविकास आघाडीच्या सत्ताकेंद्री वृत्तीला कंटाळली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे हा सक्षम पर्याय आहे. निवडणुकीची लढाई जनता विरोधात आजचे आणि कालचे सत्ताधारी अशी आहे. त्यामुळे निवडणुकीच्या लढाईला सामोरे जाऊन यश मिळवता येऊ शकेल,’ अशी भावना मनसेचे पदाधिकारी व्यक्त करतात. मात्र, सध्या त्यांच्याकडे सक्षम उमेदवारच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे तूर्त कसबा, कोथरूड, शिवाजीनगर, पर्वती, हडपसर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या मतदारसंघांवरच पक्षाने लक्ष केंद्रीत केले आहे. वडगावशेरी आणि पहिला आमदार देणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी आयात उमेदवारांवरच पक्षाची भिस्त राहणार आहे. त्या दृष्टीने स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून चाचपणी सुरू झाली आहे.

हेही वाचा – येथे घराणेशाहीला फारशी ‘जागा’ नाही!

महायुती आणि महाविकास आघाडीमधील अनेक मातब्बर नेते मनसेच्या संपर्कात असल्याचा पदाधिकाऱ्यांचा दावा आहे. ज्या ठिकाणी उमेदवार नसतील किंवा ते सक्षम नसतील, तर संपर्कात असलेल्या अन्य पक्षांतील नेत्यांना मनसेत घेण्यासंदर्भातील भावना पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांना कळविली आहे. त्या दृष्टीनेही यापूर्वी झालेल्या बैठकीत वेळोवेळी चर्चा झाली आहे. त्याबाबतचा अधिकृत निर्णय अद्यापही झालेला नाही, असे मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – नेत्याच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत शिवसैनिक पायी निघाले, वाचा सविस्तर…

राज ठाकरे यांचा दौरा रद्द

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी पुणे दौऱ्यावर येणार होते. त्याचे नियोजन गेल्या दहा-बारा दिवसांपासून केले जात होते. मात्र, हा दौरा काही कारणास्तव रद्द करण्यात आला. या दौऱ्यात कोथरूड, कसबा, पर्वती, शिवाजीनगर आणि हडपसर मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावाची चर्चा होणार होती. मात्र, दौरा रद्द झाल्याने ही चर्चाही लांबणीवर पडली आहे.