पुणे : महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ताकदीने उतरण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. मात्र, प्रचारात सक्रिय असताना मनसे नेत्यांचा योग्य सन्मान राखला जावा, अशी अपेक्षा मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून, भाजपनेही त्याला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात मनसेकडून प्रचार केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर महायुतीच्या प्रचारात कशा पद्धतीने सहभागी व्हायचे, यादृष्टीने मनसेच्या प्रमुख नेत्यांची काही दिवासंपूर्वी बैठक झाली होती. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यावेळी महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी अमित ठाकरे यांची मनसे पक्ष कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर मनसे पूर्ण ताकदीने प्रचारात सक्रिय होईल, असे ठाकरे यांनी जाहीर केले. मनसे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, सरचिटणीस अजय शिंदे, रणजित शिरोळे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी नगरसेवक हेमंत रासने यावेळी उपस्थित होते. या भेटीनंतर मोहोळ आणि मनसेचे सरचिटणीस वागसकर यांनी संयुक्तपणे पत्रकारांशी संवाद साधला. शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्रिय होतील. मात्र, त्यांचा यथोचित सन्मान राखला जावा, अशी अपेक्षा वागसकर यांनी यावेळी व्यक्त केली.
‘शहरातील पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी, संघटकांबरोबर चर्चा करण्यात आली आहे. अमित ठाकरेही सर्वांबरोबरच चर्चा करत आहेत. सन्मानाची वागणूक महायुतीचे पदाधिकारी देतील, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार प्रचारात सक्रिय होणार असल्याचे,’ वागसकर यांनी सांगितले.
अमित ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. मनसे प्रचारात सक्रिय होणार असल्याने महायुतीची ताकद वाढणार आहे. राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग शहरात आहे. सर्वच पक्ष एकदिलाने काम करून मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त करतील. – मुरलीधर मोहोळ, उमेदवार, महायुती</p>
वसंत मोरेंना टोला
अमित ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर वसंत मोरे यांना अमित ठाकरे यांनी टोला लगाविला. मनसेने पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा मोरे यांनी व्यक्त केली होती. त्यासंदर्भात बोलताना ठाकरे म्हणाले की, मोरे यांना पंतप्रधान होण्याचे स्वप्न पडत आहे. ते समाजमाध्यमाच्या आहारी गेले आहेत. मनसेच्या पाठिंब्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा मोरे यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी आणि राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा.
मुंबईत राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची सभा होईल, अशी शक्यता बोलून दाखविताना भाजपला देशात तीनशेपेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला.