कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या, फटाक्यांचा आवाज काढणाऱ्या बुलेटचा त्रास हे सर्वच शहरात नित्याची गोष्ट झाली आहे. अनेकदा या विरोधात नागरिक तक्रार करतात, वेळोवेळी पोलीस कारवाई केली जाते तरीही बेजबाबदार बुलेट चालकांचा त्रास काही कमी होत नाही. पुण्यात निगडी इथे पोलीसांच्या कारवाईची वाट न बघता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वतःच कारवाईचा मार्ग धरला. बुलेटच्या सायलेन्सरमधून कर्णकर्कश्य आवाज काढणाऱ्या आणि बिनधास्त वावरणाऱ्या बुलेट चालकाला पिंपरी- चिंचवड मनसे शहराध्यक्ष सचिन चिखल यांनी मनसे स्टाईलने चोप दिला आहे.
निगडीतील माता अमृतानंद शाळा, शिवभूमी शाळा, मॉर्डन शाळा, परिसरातील नागरिक आणि महाविद्यालयीन तरुणींना या बुलेट टवाळखोरांचा अधिक त्रास सहन करावा लागत होता. तशा तक्रारी समोर आल्यावर मनसेने हे पाऊल उचलले आहे. चिखले यांनी काही सहकाऱ्यांसह बुलेट चालकांना अक्षरशः चोपून काढलं आहे, कानशिलात लगावल्या आहेत. या कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.