महापालिका शिक्षण मंडळ बरखास्तीचा नेमका प्रस्ताव काय आहे आणि तो कशासाठी मांडण्यात आला आहे हे अद्यापही स्पष्ट झालेले नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यासंबंधीची भूमिका अद्याप निश्चित केलेली नाही. तसेच मंडळ बरखास्त करू नये यासंबंधीचे जे निवेदन इतर पक्षांनी शासनाला दिले आहे, त्यावरही आम्ही स्वाक्षरी केलेली नाही, असे शिक्षण मंडळ सदस्या विनिती ताटके यांनी गुरुवारी सांगितले.
राज्यातील सर्व शिक्षण मंडळे बरखास्त करून मंडळांचा कारभार महापालिकांकडे देण्याबाबत शासनाने प्रस्ताव तयार केला असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच या प्रस्तावावर अंतिमत: शिक्कामोर्तब होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विविध महापालिकांमधील शिक्षण मंडळ सदस्य चांगलेच हैराण झाले आहेत. किमान सध्याच्या सदस्यांना त्यांची मुदत पूर्ण करू द्यावी, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली जात आहे. पुणे आणि िपपरीतील शिक्षण मंडळ सदस्य त्यासाठी दोन दिवसांपूर्वी पवार यांच्याकडे गेले होते.
या प्रस्तावाबाबत बोलताना मनसेच्या ताटके म्हणाल्या की, मुळात शासनाने हा प्रस्ताव का तयार केला आहे ते आम्हाला समजलेले नाही. तसेच हा निर्णय नेमका कोणत्या स्तरावर झाला आहे त्याचीही माहिती मिळालेली नाही. बरखास्तीसंबंधीची चर्चा सुरू असली, तरी त्याचे कारण व अन्य माहिती समजलेली नसल्यामुळे या विषयातील आमची भूमिका आम्ही अद्याप निश्चित केलेली नाही. तसेच त्याबाबत कोणताही निर्णय मनसेने घेतलेला नाही.
मंडळे बरखास्तीच्या विरोधात जे पत्र शिक्षण मंडळ सदस्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे त्यावरही शिक्षण मंडळातील मनसेच्या दोन्ही सदस्यांनी स्वाक्षरी केली नसल्याचे ताटके यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा