पिंपरी महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी चिंचवड येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याने महिलांचा मोठा सहभाग असलेल्या ५० जणांच्या जमावाने गुरुवारी आयुकांच्या मोटारीवर हल्ला चढवला. अर्वाच्य शिवीगाळ करत जमावाने मोटारीवर लाथा-बुक्क्य़ा मारल्या व चपला फेकून मारल्या. आंदोलक व सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये झटापट सुरू असताना वाहनचालकाने वेळीच मोटार बाहेर काढल्याने पुढील प्रकार टळला. याप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांना अटक केली आहे.
आयुक्त परदेशी यांनी अनधिकृत बांधकामाच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे, त्यावरून नागरिकांमध्ये रोष आहे. गुरुवारी चिंचवडच्या मोहननगर भागात शिवदर्शन कॉलनी येथे नाल्यावर केलेले बांधकाम पाडण्यात आले. या भागातील अन्य नागरिकांना अनधिकृत बांधकामप्रकरणी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत, त्यामुळे कारवाई होऊन आणखी घरे पाडण्यात येतील अशी धास्ती नागरिकांमध्ये होती. त्यामुळे यासंदर्भात चर्चा करण्यासाठी संबंधित नागरिक महापालिकेत आले. मात्र, बराच वेळ झाल्यानंतरही आयुक्तांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे ते संतापले व आयुक्तांच्या मोटारीजवळ येऊन थांबले. दुपारी दोन वाजता आयुक्त भोजनाकरिता घरी जाण्यासाठी निघाले. तेव्हा प्रवेशद्वारासमोर नागरिकांनी विशेषत: महिलांनी आयुक्तांच्या मोटारीला घेराव घातला. काही महिला मोटारीसमोर आडव्या पडल्या. आयुक्त मोटारीत बसले. तेव्हा त्यांना बाहेरून अर्वाच्य शिवीगाळ दिल्या जात होत्या. चहुबाजूने मोटारीला घेराव घालण्यात आला. काहींनी मोटारीला लाथा-बुक्क्य़ा मारल्या. या प्रकाराने अंगरक्षक व सुरक्षारक्षकांची तारांबळ उडाली. त्यांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रचंड झटापट झाली. मोटारीसमोरील महिलांना ओढून बाजूला काढण्यात आले, तेव्हा चालकाने मोटार बाहेर काढली. दरम्यान, पोलिसांना पाचारण करण्यात आले. पिंपरी ठाण्याचे निरीक्षक बी. मोदीराज यांच्या पथकाने आंदोलकांना अटक केली. उशिरापर्यंत याबाबतची कारवाई सुरू होती. या प्रकाराने पालिका वर्तुळात खळबळ उडाली. तणावपूर्ण वातावरण असल्याने महापालिकेत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.
आंदोलन पूर्वनियोजित नव्हते- आयुक्त
आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मोहननगरचे काही नागरिक आमची घरे अधिकृत आहेत, त्यांच्यावर कारवाई करू नका, असे सांगण्यासाठी आले होते. मी मोटारीत बसून त्यांचे म्हणणे ऐकून घेत होतो. त्यांनी विनंती केल्यानंतर पुरावे सादर करा, निर्णयाचा फेरविचार करू, असे त्यांना सांगत होतो. दोन मिनिटे हे संभाषण झाले. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रस्ता मोकळा करून दिला व आपण पुढे निघून गेलो. नागरिकांचे हे आंदोलन ठरवून केलेले नव्हते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा