पुण्यातील नऱ्हे भागातील सीएनजी पंपावर रांगेत वाहने लावण्यास सांगितल्याने टोळक्याने दहशत माजवून पंपावरील कामगाराला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली. आकाश पासलकर (वय २२), ज्ञानेश्वर पासलकर (वय २४, दोघे रा.आंबेगाव खुर्द), रोहित चव्हाण (वय २४, रा. कोल्हेवाडी), निखिल खोपडे (वय २०, रा. आंबाडे, ता. भोर, जि. पुणे), विपुल खोपडे (वय २४), किरण खोपडे (वय २२, दोघे रा. नऱ्हे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
संदीप आनंदा हांडे (वय ३०, रा. सिद्धी टेरेस, रायकरनगर, धायरी) यांनी या संदर्भात सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हांडे यांचा नऱ्हे परिसरातील पारी कंपनी चौकात सीएनजी पंप आहे. सीएनजी पंपावर आरोपी पासलकर, चव्हाण, खोपडे मोटारीतून आले.
पंपावरील कामगार सतीश जाधव यांनी त्यांना मोटार रांगेत लावण्यास सांगितले. या कारणावरुन आरोपी चिडले आणि त्यांनी कामगार जाधव यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जाधव यांना बेदम मारहाणही करण्यात आली.
हेही वाचा : पुणे : जोगत्याचे अपहरण; ताम्हिणी घाटात गोळ्या झाडून खून, संशयावरुन दोघे ताब्यात
या मारहाणीत सीएनजी पंपावरील कर्मचारी सतीश जाधव जखमी झाले. मारहाणीनंतर आरोपी पसार झाले, मात्र पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सहायक पोलीस निरीक्षक तांदळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.