पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा भेदून कैद्यांकडून मोबाइलचा वापर करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. कारागृहात पुन्हा कैद्यांकडे दोन मोबाइल संच, सीमकार्ड आढळून आले आहे. मोबाइल सापडण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने येरवडा कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी चार कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालीम आस मोहमद खान ,राजू तुकाराम अस्वले, सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप, आकाश उत्तम रणदिवे अशी गुन्हा दाखल केलेल्या कैद्यांची नावे आहेत. याबाबत कारागृह अधिकारी रेवणनाथ कानडे (वय ५४) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेले कैदी न्यायाधीन बंदी (कच्चे कैदी) आहेत. कारागृहात अधिकारी गस्त घालत होते. त्यावेळी तालीम खान मोबाइल वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी खानची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे मोबाइल संच आणि बॅटरी सापडली.
अधिकाऱ्यांनी बराकीतील राजू अस्वले, सचिन घोलप, आकाश रणदिवे यांचीही झडती घेतली. तेव्हा अस्वलेकडे मोबाइल संच, बॅटरी, सीमकार्ड मिळाले. येरवडा कारागृहात यापूर्वी मोबाइल संच सापडले होते. किरकोळ वादातून कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनेची गंभीर दखल घेऊन कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी तत्कालीन अधीक्षक राणी भोसले यांची ठाणे कारागृहात बदली केली होती.