उषा थोरात यांचे मत
संपूर्ण जग जागतिकीकरणाकडे आगेकूच करत असताना भविष्यामध्ये मोबाईल बँकिंग ही काळाची गरज ठरणार आहे, असे मत रिझव्‍‌र्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांनी व्यक्त केले. मात्र, सध्या भारत मोबाईल बँकिंगमध्ये मागे असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे आयोजित कार्यक्रमात ‘आर्थिक सक्षमीकरण-अवलोकन आणि अपेक्षा’ या विषयावर थोरात बोलत होत्या. सेंटरचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, फोर्स मोटर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया, मानद संचालक प्रशांत गिरबने या वेळी उपस्थित होते.
थोरात म्हणाल्या, दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर अनेक राज्ये कर्जमाफी जाहीर करीत आहेत. मात्र, कर्जमाफी हा पर्याय नसून या प्रक्रियेत ‘क्रेडिट कल्चर’ आणणे गरजेचे आहे. त्यामुळे जे नागरिक वेळेवर कर्जप्रक्रिया पूर्ण करीत कर्ज फेडत आहेत त्यांच्यापर्यंत चुकीचा संदेश जाणार नाही. त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या क्षमतांमध्ये वाढ करण्यासाठी सरकारने एकत्र येत काम करणे गरजेचे आहे.
सत्तरीच्या दशकात देश खऱ्या अर्थाने आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करू लागला. मात्र, १९९१ च्या आर्थिक संकटामुळे सक्षमीकरणाची धोरणे पूर्ण बदलली. या दरम्यान महिला बचत गटांच्या स्थापनेने अर्थव्यवस्थेला मिळालेली बळकटी हे उत्तम उदाहरण आहे. देशाला केवळ आर्थिक सक्षमता गरजेची नसून सामाजिक सक्षमीकरण जास्त आवश्यक आहे, असेही थोरात यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile banking important for the future says usha thorat
First published on: 12-07-2016 at 06:39 IST