पुणे : मोबाइल चार्जर खरेदी एका ज्येष्ठाला महागात पडली. ऑनलाइन मागविलेल्या चार्जरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कंपनीला परत पाठविणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी पाच लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार सहकारनगर भागात राहायला आहे. त्यांनी एका ऑनलाइन पद्धतीने चार्जर खरेदी केला होता. चार्जरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने त्यांनी कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्रात संपर्क साधला. त्यानंतर चोरट्यांनी ज्येष्ठाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. चार्जर परत पाठविल्यास नवीन चार्जर पुन्हा पाठवितो, असे सांगून चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठविली. या लिंकवर तक्रारदाराला त्याची वैयक्तिक, तसेच बँक खात्याची माहिती पाठविण्यास सांगितले. चोरट्यांनी बँक खात्याची माहितीचा गैरवापर करुन ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने पाच लाख ३६ हजार रुपये काढून घेतले.

हेही वाचा – “मी अजितदादांवर नाराज नाही”, शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांची प्रतिक्रिया

हेही वाचा – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मोदीबागेत’ भेटी-गाठींना जोर

खात्यातून पैसे काढून घेतल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल मोरे तपास करत आहेत. ऑनलाइन खरेदी विक्री व्यवहारात सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. ऑनलाइन वस्तू विक्री करणाऱ्या कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्रातील संपर्क क्रमांकाऐवजी चोरटे त्यांचे मोबाइल क्रमांक टाकतात. या क्रमांकावर ग्राहकाने तक्रार दिल्यास चोरटे खरेदीदारांची वैयक्तिक माहिती घेऊन फसवणूक करतात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile charger for five lakh seniors citizen cheated by cyber thieves pune print news rbk 25 ssb