नाशिक कारागृहात मोबाइल सापडल्याचे प्रकरण ताजे असताना पुण्यातील येरवडा कारागृहात शुक्रवारी दुपारी सर्कल तीनमध्ये फेकून दिलेला मोबाइल येथील कर्मचाऱ्यांना सापडला. ‘हा मोबाइल कोणी आणला, तो आत कसा आला याची कारागृह प्रसासनाने चौकशी सुरू केली आहे,’ अशी माहिती येरवडा कारागृहाचे पोलीस अधीक्षक योगेश देसाई यांनी दिली.
येरवडा कारागृहात संशयित दहशतवादी कतिल सिद्दीकीचा खून झाल्यानंतर येथील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. मात्र, कारागृहातील शिपायांना शुक्रवारी दुपारी सर्कल तीनमधून जाताना जमिनीवर एक मोबाइल आढळून आला. त्यांनी तत्काळ याची माहिती वरिष्ठांना कळवून मोबाइल कारागृह प्रशासनाकडे जमा केला. हा मोबाइल चालू स्थितीतील असून त्याच्यामध्ये सीमकार्डही मिळून आले आहे. त्यामुळे वापर करून हा मोबाइल फेकून दिला आहे. कारागृहात जाताना कैद्यांची कसून चौकशी केली जाते. तरीही हा मोबाइल कोणी आणला, तो कारागृहात कसा आला याचा तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वीच येरवडा कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ तपासणीत गांजा मिळाला होता. आता थेट कारागृहात मोबाइल आढळून आल्यामुळे येथील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच कारागृहामध्ये मोबाइल जॅमर बसविण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र, त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा