पुणे विभागातील पुण्यासह नगर, सातारा व सोलापूर या जिल्ह्य़ातील प्रमुख टपाल कार्यालयांमध्ये नागरिकांसाठी ‘मोबाइल मनी ट्रान्सफर’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेच्या वापरातून टपाल खात्याच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तातडीने पैसे पाठविणे शक्य होणार आहे.
टपाल खात्याची ही सुविधा सध्या दिल्ली, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब व झारखंड राज्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ महाराष्ट्रात मुंबई व पुणे विभागामध्ये ही सुविधा देण्यात येत आहे. त्यासाठी बीएसएनएलचे सहकार्य घेण्यात आले आहे. पुणे विभागातील ३५ टपाल कार्यालयांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यात शहरातील पुणे सिटी पोस्ट, मुख्य कार्यालय, चिंचवड, मार्केट यार्ड, भोसरी, डेक्कन जिमखाना, इन्फोसेस पार्क, हडपसर, कसबा पेठ, रेंजहिल्स या टपाल कार्यालयांबरोबरच जिल्ह्य़ातील आळंदी, बारामती, चाकण, देहू रोड, लोणावळा या टपाल कार्यालयांचा समावेश आहे.
‘मोबाइल मनी ट्रन्सफर’ सुविधेमधून पैसे पाठविण्यासाठी व पैसे मिळविण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे मोबाइल असणे गरजेचे आहे. ही सुविधा असलेल्या टपाल कार्यालयात पैसे जमा केल्यास सर्व तांत्रिक गोष्टी पूर्ण करून संबंधित टपाल कार्यालयाला त्याबाबत यंत्रणेतून सूचना जातील. पैसे पाठविल्याचा व ते मिळाल्याचे ‘एसएमएस’ पाठवणारा व पैसे घेणाऱ्या दोघांनाही जातील. याबाबतची माहिती संबंधित टपाल कार्यालयांमध्येही उपलब्ध करण्यात आली आहे. या सेवेसाठी १००० ते १५०० पर्यंतच्या रकमेसाठी ४५ रुपये सेवाशुल्क आहे. १५०१ ते ५००० पर्यंतच्या रकमेसाठी ७९ रुपये, तर ५००१ ते १०००० पर्यंतच्या रकमेसाठी ११२ रुपये सेवाशुल्काची आकारणी करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा