हडपसर भागातील एका उद्यानात नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाइल हिसकावून पसार झालेल्या टोळीला वानवडी पोलिसांच्या पथकाने अटक केली. आरोपींकडून चार मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत.बंटी निकाळजे, चिक्या भडके, अनिकेत सोनवणे, सुमित शिंदे, मोनू शेख (रा. रामटेकडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत मनमोहन तिवारी (रा. रामटेकडी) यांनी फिर्याद दिली होती. तिवारी नातेवाईकांसह हडपसर भागातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यानात आले होते. त्या वेळी आरोपी निकाळजे, भडके, शिंदे, शेख तेथे आले. त्यांनी तिवारी आणि त्यांच्या नातेवाईकांना मारहाण केली.
चाकूने वार करुन त्यांच्याकडील मोबाइल संच हिसकावून आरोपी पसार झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर वानवडी पोलिसांच्या पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे झालेल्या चित्रीकरणाची पडताळणी केली. त्यानंतर निकाळजे, भडके, साेनवणे, शिंदे, शेख यांना पकडले. आरोपींबरोबर असलेल्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून चाकू आणि चोरलेले चार मोबाइल संच जप्त करण्यात आले. वानवडी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक जयवंत जाधव, उपनिरीक्षक अजय भोसले, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, महेश गाढवे, राहुल गोसावी आदींनी ही कारवाई केली.