मोबाईल तीन वेळा दुरुस्तीला देऊनही दुरुस्त होत नाही. वॉरंटी काळात हा बिघाड झाला तरीही त्याचे पैसे परत मिळत नाही आणि सतत पाठपुरावा करूनही समस्या सुटत नाही.. असा अनुभव सॅमसंग कंपनीचा मोबाईल वापरणाऱ्या एका ग्राहकाला आला. अखेर त्यांना ग्राहक न्यायालयाचे दार ठोठवावे लागले आणि न्यायालयानेही त्यांना न्याय मिळवून दिला. महाबळ यांना मोबाईल संचाची रक्कम आणि नुकसान भरपाईसुद्धा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
नितीन महाबळ यांनी याबाबत तक्रार दिली होती. महाबळ यांनी ८ मार्च २०१२ रोजी महेंद्र इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इलेक्ट्रिकल्स यांच्याकडून सॅमसंगचा मोबाईल घेतला. त्यांनी सॅमसंगचेच स्टिरिओ ब्ल्यूटुथही वापरायला सुरुवात केली. मात्र, काही दिवसांनी स्टिरिओ ब्ल्यूटूथ बंद केल्यानंतर फोनमधून काही ऐकू येत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी १८ ऑगस्टला मोबाईल सॅमसंगच्या सेवा केंद्रामध्ये दुरुस्तीसाठी दिला. पण नंतर पुन्हा फोनमधून काही ऐकू येईनासे झाले. महाबळ यांनी एकाच कारणासाठी तीन वेळा मोबाईल दुरुस्तीसाठी दिला. पण तो पूर्ण दुरुस्त झालाच नाही. सॅमसंग सपोर्ट टीमशी संपर्क साधल्यानंतर त्यांनीही मोबाईल आणि ब्ल्यूटूथ सेवा केंद्रात दुरुस्तीसाठी देण्यास सांगितले. २२ सप्टेंबर रोजी दुपारी तिसऱ्यांदा मोबाईल दुरुस्त करून मिळाला पण दुपारी ४.३० च्या सुमारास तो दुरुस्त झालेलाच नाही असे त्यांना दिसून आले. मोबाईलमधले सॉफ्टवेअर बदलले, पोर्ट आणि मदरबोर्डही बलण्यात आला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
सपोर्ट टीम, सेवा केंद्राचे प्रमुख आणि महाबळ यांचा कॉन्फरन्स कॉलही झाला. त्या वेळी मोबाईल बदलून देण्याचे आश्वासन देण्यात आले. पण प्रत्यक्षात कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत. केवळ मोबाईल दुरुस्तीसाठी द्या असे वारंवार सांगण्यात आले. शेवटी महाबळ यांनी ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागण्याचे ठरवले. न्यायालयाने सॅमसंग सेवा केंद्र तसेच महेंद्र इलेक्ट्रॉनिक्सला ग्राहकाला योग्य सेवा न दिल्याबद्दल दोषी ठरवून महाबळ यांच्या मोबाईलची पूर्ण रक्कम २०,८०० रुपये, मानसिक व शारीरिक त्रासासाठी पाच हजार रुपये आणि खटल्यासाठीचे दोन हजार रुपये म्हणजे एकूण २७ हजार ८०० रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा