पुणे : येरवडा कारागृहातील एका बराकीतील स्वच्छतागृहात मोबाईल संच ठेवल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी कारागृह प्रशासनाकडून येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या पूर्वी कारागृहात गांजा सापडला होता. कारागृहात गांजा पोहोचविल्याप्रकरणी एका कारागृह रक्षकावर कारवाई करून त्याला अटकही करण्यात आली होती.
कारागृह प्रशासनाच्या वतीने सागर बाजीराव पाटील (वय ३८,रा. कारागृह वसाहत, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील बराकी आणि परिसराची नियमित तपासणी केली जाते. सोमवारी सायंकाळी कारागृहातील अधिकारी भिरू खळबुटे, अतुल तोवर कारागृहातील सर्कल क्रमांक एक आणि बराक क्रमांक तीनमधील स्वच्छतागृहाची तपासणी करत होते. त्या वेळी स्वच्छतागृहातील पत्रा वाकल्याचे आढळून आले. पत्रा उचकटून पाहिले असता तेथे मोबाईल संच ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले. मोबाईलमध्ये सीमकार्ड नसून बॅटरीचे चार्जिंग करण्यात आले नव्हते.
हेही वाचा – पुणे जिल्हा वार्षिक योजनेचा १०० टक्के निधी खर्च; आगामी वर्षाचा आराखडा १००५ कोटींचा
या घटनेची माहिती त्वरित कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. कारागृहाच्या पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कारवाईसाठी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोबाईल संचाचा वापर कोणी केला, तसेच कारागृहात मोबाईल पोहोचला कसा, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करत आहेत.