पुणे : पुणे रेल्वे स्थानक, ससून रुग्णालय परिसर, तसेच गर्दीच्या ठिकाणांहून नागरिकांचे गहाळ, तसेच चोरीला गेलेल्या मोबाइलचा बंडगार्डन पोलिसांनी शोध घेतला. पोलिसांनी ५१ मोबाइल संच शोधून काढून तक्रारादारांना परत केल्याने त्यांना दिलासा मिळाला. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या हस्ते तक्रारदारांना मोबाइल संच परत करण्यात आले.

पुणे शहरातून मोबाइल चोरीला जाणे, तसेच गहाळ होण्याचे प्रमाण मोठे आहे. एकदा का मोबाइल चोरीस किंवा गहाळ झाल्यास परत मिळण्याची शाश्वती नसते. मोबाइलमध्ये महत्वाची माहिती, तसेच छायाचित्रे असतात. मोबाइल संच चोरी, तसेच गहाळ झाल्याच्या तक्रारी बंडगार्डन पोलीस ठाण्यातील सायबर कक्षाकडे आल्या होत्या. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, गु्न्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ, कर्मचारी विष्णू सरवदे, सागर घोरपडे, निलेश पालवे यांच्या पथकाने हरवलेल्या मोबइल संचाची माहिती संकलित करून तांत्रिक तपास सुरू केला. हरवलेले मोबाइल संच राज्यातील वेगवेगळ्या भागात वापरात असल्याचे तांत्रिक तपासात निदर्शनास आले. तांत्रिक विश्लेषण करुन पोलिसांनी गहाळ झालेेले मोबाइल वापरणाऱ्या नागरिकांसी संपर्क साधला. त्यांना बंडगार्डन पोलीस ठाण्यात मोबाइल परत करण्यास सांगितले. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या हस्ते तक्रारदारांना मोबाइल संच परत करण्यात आले.

हेही वाचा >>>नवा शहरी रोग !

पुणे स्टेशन परिसरात सर्वाधिक मोबाइल चोरी

अहोरात्र गजबजलेल्या पुणे स्टेशन परिसरातून नागरिकांचे मोबाइल चोरीला जाण्याचे प्रमाण मोठे आहे. बंडगार्डन पोलिसांनी चोरलेल्या, तसेच गहाळ झालेल्या मोबाइलचा शोध घेतला. मोबाइल संच गहाळ झाल्यास त्वरीत पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर किंवा केंद्र शासनाच्या सीईआयआर पोर्टलवर नोंद करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.