मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, रत्नागिरी, सोलापूर, नागपूरसह गोवा, कर्नाटक, गुजरात, केरळ अशा राज्य व परराज्यात मोबाईल शॉपी, वाईन्स शॉप, मेडिकलची दुकाने फोडणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीस गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने गजाआड केले आहे. आरोपींकडून जवळपास २१ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
महंमद इब्राहिम अकबर शेख (वय-३२, वाशी, नवी मुंबई), नूरमहंमद करीम शेख ऊर्फ लड्डू (वय-३९, मुंब्रा, ठाणे), महंमद ईम्रान हानीफ कुरेशी (वय-३१, रफीकनगर, गोवंडी, मुंबई), अब्दुल रहीम अब्दुल करीम शेख (वय-२४, कुर्ला, मुंबई) अशी या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी मुंबई येथील युसूफ समद खान (काका मंजील, मुंब्रा, ठाणे) यांना चोरीचा माल विकला होता, त्यामुळे खानलाही अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनील पवार, सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे यांच्यासह संजय गवारे, गुनशिलन रंगम, महेंद्र पवार, भरत उदाळे, शशीकांत शिंदे, राजेंद्र मोरे, काळूराम रेणूसे, विवेकानंद सपकाळे, राजू काकडे, धनंजय चव्हाण, अशोक गायकवाड आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.
मुंबईतील ही टोळी पुण्यात सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांच्याविषयी सविस्तर माहिती मिळाल्यानंतर औंध पुलाजवळ सापळा लावण्यात आला. एका स्कॉर्पिओतून आरोपी तेथे येताच पोलिसांनी त्यांना अटक केली. बाणेर येथे ‘सॅमसंग’ चे शोरूम फोडून एलसीडी व मोबाईल सेट असा साडेसात लाखाचा माल चोरल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. त्याचप्रमाणे, सांगवी, हिंजवडी, चतु:शृंगी, भारती विद्यापीठ, सहकारनगर आदी भागातील मोबाईल शॉपी, वाईन्स, मेडिकलची दुकाने फोडून चोरी केल्याची कबुलीही आरोपींनी दिली आहे. आरोपींकडून घरफोडीचे साहित्य, स्कॉर्पिओ, ४ एलईडी, १४ मोबाईल सेट असा १५ लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
 ऐवज मिळाला, रोख रकमेचे काय?
आरोपींनी दुकाने फोडताना रोख रक्कमही लंपास केली होती. पोलिसांकडे तशी कबुलीही आरोपींनी दिली होती. प्रत्यक्षात आरोपींकडून काहीही रक्कम हस्तगत होऊ शकली नाही. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता आरोपींकडून पैसे मिळाले नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.