पुणे शहरामध्ये यापूर्वी घडलेल्या दहशतवादी कारवाया लक्षात घेता गणेशोत्सवासाठी पोलिसांकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. गुप्तचर विभाग, सायबर सेलसह सर्वच विभागांना अतिदक्षतेच्या सूचना देण्याबरोबरच शहरात मोबाईल सिमकार्ड विक्रीवरही करडी नजर ठेवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोबाईल कंपन्यांचे प्रतिनिधी व वितरकांची एक बैठक पोलिसांनी घेतली असून, सिमकार्ड देताना घ्यावयाच्या काळजीबाबत कठोर आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आता सिमकार्ड घेणाऱ्या ग्राहकाच्या मूळ कागदपत्राची तपासणी करण्याबरोबरच त्याच्या अंगठय़ाचा ठसाही घेतला जाणार आहे.
बनावट किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या कागदपत्रांचा वापर करून मिळविलेल्या सिमकार्डचा वापर गुन्ह्य़ांमध्ये होत असल्याचे यापूर्वी अनेकदा स्पष्ट झाले आहे. गणेशोत्सवाच्या काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, त्याचप्रमाणे दहशतवादी कारवायांना आळा घालण्याच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्ताच्या विविध उपायांबरोबरच पोलिसांनी सिमकार्डच्या विक्रीवरही लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी विविध मोबाईल कंपन्यांचे प्रतिनिधी व सिमकार्ड पुरविणारे वितरक तसेच दुकानदार यांची पोलीस मुख्यालयात बैठक घेतली. पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र जोशी, दहशतवादी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांनी मोबाईल सिमकार्डच्या विक्रीबाबत विविध सूचना कंपन्यांचे प्रतिनिधी व वितरकांना केल्या.
कागदपत्रांची छायांकित प्रत दिल्यास मोबाईल कंपन्यांकडून संबंधिताला सिमकार्ड दिले जात होते. त्यात वेळोवेळी काही बदल करण्यात आले. मात्र, प्रतिनिधी व वितरकांशी झालेल्या बैठकीमध्ये सिमकार्ड देण्याबाबत अधिक कठोर नियम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केवळ छायांकित प्रत नव्हे, तर ग्राहकाची मूळ कागदपत्रे पाहूनच सिमकार्डचा अर्ज भरण्यात यावा. ग्राहकाचा पर्यायी मोबाईल क्रमांक घेऊन त्यावर संपर्क साधून पडताळणी करावी. ग्राहकाची सर्व प्रकारची नोंद ठेवणे व मुख्य म्हणजे सिमकार्ड घेणाऱ्या व्यक्तीच्या अंगठय़ाचा ठसा घेण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. बोगस सिमकार्डबाबत काही माहिती उपलब्ध झाल्यास संबंधितांनी एकमेकांशी संपर्कात राहून त्याबाबत वेळीच दखल घेऊन बोगस सिमकार्ड धारकाची माहिती तत्काळ पोलिसांना देण्याबाबतच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
इंटरनेटवरील वेबसाईटवरही लक्ष
गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या सूचनांनुसार पोलिसांच्या सायबर सेललाही दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून पाहिल्या जाणाऱ्या विविध वेबसाईट व अक्षेपार्ह गोष्टींवरही सायबर सेलकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. शहरात सक्रिय असलेल्या विविध टोळ्यांमधील गुन्हेगारांवर सध्या कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहराच्या सर्व प्रमुख चौकात व रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असल्याने या कॅमेऱ्यांच्या मदतीने संशयास्पद गोष्टींवर लक्ष ठेवून तातडीने कारवाई करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा